सत्ताबदल ठरविणारी जागा साकेश्वर जनसेवाने जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:29+5:302021-03-14T04:20:29+5:30
जामखेड : साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेसाठी झालेली निवडणूक पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर व ...
जामखेड : साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेसाठी झालेली निवडणूक पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या गटाने जिंकली. सलग चौथ्यांदा मुरुमकर गटाने ग्रामपंचायत ताब्यात घेतली.
साकत ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक १८ फेब्रुवारीला झाली होती. या निवडणुकीत डॉ. भगवानराव मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली साकेश्वर जनसेवा पॅनल होता. बाजार समितीचे संचालक संजय वराट व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांच्या नेतृत्वाखाली साकेश्वर परिवर्तन पॅनल होता. दोन्ही मंडळाने प्रत्येकी सहा जागा जिंकल्या होत्या. एका जागेचा वाद होता. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १२ मार्चला निवडणूक जाहीर केली होती. एक जागा ज्यांची निवडून येणार त्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत येणार असे सरळ गणित होते. त्यामुळे दोन्ही गटांनी प्रभाग दोन कोल्हेवाडी येथील एका जागेसाठी जोर लावला होता.
कुरूमकर-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवार जिजाबाई देवराव कोल्हे या होत्या, तर संजय वराट व अरुण वराट यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवार मैना शिवाजी कोल्हे या होत्या. यामध्ये कुरुमकर-पाटील यांच्या गटाच्या जिजाबाई देवराव कोल्हे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव साळवे व प्रमोद कुटाळे यांनी काम पाहिले, तर मतमोजणी अधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे होते.