साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:24 AM2019-08-10T11:24:46+5:302019-08-10T11:35:47+5:30
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे
अहमदनगर : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना जोपर्यंत मंजूर होत नाही व मंजुरीचे पत्र हातात पडत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला.
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा, नगर तालुक्यातील ३५ गावांना लाभदायक ठरणारी साकळाई उपसा सिंचन योजना फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरती चर्चेत येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी योजनेबाबत आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हा प्रश्न असाच असल्याने शुक्रवारपासून दीपाली सय्यद यांनी उपोषण सुरू केले आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेला जोपर्यंत मंजुरीचे पत्र हाती पडणार नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सय्यद यांनी केला आहे.
सय्यद यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे, ज्येष्ठ नेते दादापाटील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळनंतरही आंदोलन सुरूच होते. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री सय्यद यांनी आंदोलन सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी अभिनेता विजय पाटकर, मानसी नाईक, स्मिता परदेशी यांच्यासह अन्य मराठी सिनेकलाकार येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.