साकळाई, कोंगजाईचा डोंगरमाथा हिरवाईने नटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 02:49 PM2020-07-19T14:49:45+5:302020-07-19T14:50:21+5:30
यंदा हंगामाच्या सुरुवातीला धो धो पाऊस बरसल्याने श्रीगोंदा-नगर-कर्जत तालुक्यांच्या हद्दीवरील साकळाई, कोंगजाई डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. येथील ओढे-नाले वाहू लागले असून धबधबे कोसळू लागले आहेत. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू लागला आहे.
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : यंदा हंगामाच्या सुरुवातीला धो धो पाऊस बरसल्याने श्रीगोंदा-नगर-कर्जत तालुक्यांच्या हद्दीवरील साकळाई, कोंगजाई डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. येथील ओढे-नाले वाहू लागले असून धबधबे कोसळू लागले आहेत. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू लागला आहे.
साकळाई, कोंगजाई, काशी विश्वनाथ, खंडोबा, महादेव दरा, खाकीबा आदी डोंगरमाथ्याची लांबी १७ ते १८ किलोमीटर इतकी आहे. डोंगरमाथा व परिसरात जैविक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पाऊस होतो. त्यामुळे डोंगरमाथ्यावर फारसे नैसर्गिक सौंदर्य फुलत नव्हते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हा डोंगरमाथा हिरवाईने नटला.
यात कोंगजाई डोंगर वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे सकाळी सहा वाजता गेले, तर ढगांचा स्पर्श, थंडगार हवा असा थेट महाबळेश्वरचाच अनुभव अनुभवायास मिळतो. येथून चांदबिबीचा महाल, अहमदनगर, श्रीगोंदा शहराचे दर्शन होते. परिसरातील तुडुंब भरलेले तलाव लक्ष वेधून घेतात.
वनदेव, श्री क्षेत्र काशी विश्वनाथ, श्री क्षेत्र महिंदेश्वर या परिसरातील डोंगर परिसर नुकत्याच पडलेल्या पावसाने फुलला आहे. डोंगरातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे कोसळू लागले आहेत. या परिसराला पौराणिक महत्त्वही आहे. विविधतेने नटलेल्या डोंगरातील झाडे, वेलीवर पशुपक्ष्यांची किलबिल वाढली आहे. परिसरात जंगली श्वापदे, मोर, ससा, हरीण, काळवीट, साळिंदर, लांडगे, जंगली डुकरे दिसत आहेत.
भानगाव येथील गुहा जंगली प्राण्यांचे निवारा हाऊस बनले आहे. या डोंगररांगेत हिरडा, बेहडा, अर्जुन, सौताडा, गुळवेल, गुंज, काळी मैना, चंदन या सारख्या वनौषधींचा खजिना आहे. चिखली घाटातील महादेव, साकळाई, कोथूळचा खंडोबा, ढोरजाचे काशी विश्वनाथ, खांडगावची कोंगजाई, कोसेगव्हाणचा महादेव दरा या देवस्थानांकडे जाणारे रस्ते आहेत. त्यामुळे तेथे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळू शकते.
साकळाई, कोंगजाई, डोंगरमाथा हा ‘मिनी सह्याद्री’ आहे. या परिसरात नैसर्गिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. हा परिसर नगर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यांना नजिक आहे. येथे प्राणी, पशु-पक्षीही आढळून येतात. पाच, सहा देवस्थाने आहेत. त्यामुळे येथे पर्यटनाला चालना मिळू शकते. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
-राजेश इंगळे, अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन.