अहमदनगरमध्ये व्हिडीओकॉनच्या कामगारांचे पगार थकले, कामगार सेनेचे आंदोलन
By साहेबराव नरसाळे | Published: May 14, 2023 05:00 PM2023-05-14T17:00:53+5:302023-05-14T17:01:26+5:30
बुऱ्हाणनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा अनेक वर्षांचा थकीत पगार तातडीने मिळावा, यासाठी जिल्हा मजदूर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर : बुऱ्हाणनगर येथे १९९१ साली व्हिडिओकॉन कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी सुमारे एक हजार कर्मचारी काम करत होते. कंपनी तोट्यात गेली व कंपनीमधील कामगारांना २०१८ पासून आत्तापर्यंत कुठलेही वेतन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, कामगारांचा अनेक वर्षांचा थकीत पगार तातडीने द्यावा. यासाठी जिल्हा मजदूर कामगार सेनेच्या वतीने आंदोलन करीत उपोषणाचा इशारा देण्यात आला.
बुऱ्हाणनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा अनेक वर्षांचा थकीत पगार तातडीने मिळावा, यासाठी जिल्हा मजदूर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार प्रतिनिधी विजया पवार, आरती बांगर, मीना रोकडे, विजया धुमाळ, संजीवनी भिंगारदिवे, सुनिता थोरात, भाऊसाहेब धनवटे, परशुराम दुसा, संजय राजूरकर, पाराजी पानसंबळ, अनिल गादिया, सुनील मुनोत, नितीन गांधी, डी. वाय. शिंदे, पंकज कुळश्रेष्ठ, रवींद्र कुदळे, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
जोपर्यंत कामगारांचे वेतन कामगार कायद्याप्रमाणे मिळत नाही, तोपर्यंत कंपनीची मालमत्ता बँकांना विकू दिली जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. जोपर्यंत आमच्या कष्टाचे वेतन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे बाबूशेठ टायरवाले यांनी सांगितले.