श्रीगोंद्यात पोलीस बंदोबस्तात दारुची विक्री; अर्धा किलोमीटर लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 12:24 PM2020-05-05T12:24:58+5:302020-05-05T12:26:10+5:30
श्रीगोंद्यात मंगळवारी (दि.५ मे) सकाळी पोलीस बंदोबस्तात सत्यम वाईन शॉप सुरु झाले. दारु खरेदीसाठी चक्क अर्धा किलोमीटरची रांग लागली होती.
श्रीगोंदा : कोरोना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. मात्र सरकारने मद्यालय सुरु केली आहेत. श्रीगोंद्यात मंगळवारी (दि.५ मे) सकाळी पोलीस बंदोबस्तात सत्यम वाईन शॉप सुरु झाले. दारु खरेदीसाठी चक्क अर्धा किलोमीटरची रांग लागली होती. पहिल्याच दिवशी दुपापर्यंत सुमारे तीन लाखांची दारुची विक्री झाल्याची माहिती समजली.
तळीरामांनी दारू खरेदीसाठी गर्दी केली होती. त्याबद्दल पोलिसांच्या साक्षीने संचारबंदी नियमावलीची पायमल्ली झाली. दारूबरोबरच मटन शॉपवरही नागरिकांची गर्दी होती. रविवारपेठेतील वाईन शॉप आणि शिव भोजनालय समोरासमोर आहे. अगोदर शिवभोजनालयासमोर गर्दी असायची ती भूक भागविण्यासाठी. पण तेथे मात्र मंगळवारी गर्दी कमी होती. पण वाईन शॉपवर मात्र मद्यपींनी मोठी गर्दी केली होती.
दारू विक्रीचा अजब निर्णय
विद्यालय, देवालय बंद आहेत. मात्र सरकारने मद्यालय सुरू केली. एखादी माता माउली रस्त्यावर भाजी विकते. तेव्हा सरकारी अधिकारी तिची भाजी फेकून देतात. सरकार पोलीस बंदोबस्तात दारुची दुकाने सुरु करते हा अजब निर्णय आहे. याविरोधात व्यापा-यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे श्रीगोंदा तालुका व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश पोखर्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.