मालेगाव येथील विवाहितेची मध्यप्रदेशात विक्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:32+5:302021-01-16T04:24:32+5:30
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मालेगाव येथील एका विवाहितेस केटरिंगच्या कामासाठी इंदोर येथे विकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला ...
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मालेगाव येथील एका विवाहितेस केटरिंगच्या कामासाठी इंदोर येथे विकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला ९ डिसेंबरपासून इंदोर (मध्यप्रदेश) येथे अडकल्याची फिर्याद तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये अनिता रवींद्र कदम (आंबेडकरनगर वसाहत, दत्तनगर, ता. श्रीरामपूर) व तिची मैत्रीण संगीता (पूर्ण नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे. पीडितेची एक लाख २० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
मालेगाव येथील विवाहिता तिच्या बहिणीच्या घरी दत्तनगर येथे राहण्यास आली होती. तेथे या विवाहितेच्या बहिणीची एक मैत्रीण घरी येत असत. या मैत्रिणीने विवाहितेला केटरिंगच्या कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित विवाहिता केटरिंगच्या कामानिमित्त अनेकदा बाहेरगावी जात होती. मात्र, ९ डिसेंबरनंतर ती दत्तनगर येथे परतली नाही. दरम्यान, मालेगाव येथील पतीने तिच्याशी संपर्क साधला. त्यात आपण इंदोर येथे अडकून पडलो आहोत. येथून सुटका होत नाही, असे तिने आपल्याला फोनवर सांगितल्याची माहिती पतीने पोलिसांना दिली आहे. पीडिता इंदोर येथे कशी गेली? तसेच तिला कोणी तेथे नेले? या गोष्टींचा अद्याप उलगडा झालेला नाही. सुटकेनंतरच या प्रकरणाची सत्यता बाहेर येणार आहे.