काश्मीरमधील जमिनींची लिथीयम उत्पादसाठी विक्री; उध्दव ठाकरेंचा आरोप
By शिवाजी पवार | Published: May 10, 2024 04:13 PM2024-05-10T16:13:01+5:302024-05-10T16:20:12+5:30
शिर्डीतील महाआघाडीच्या उमेदवाराची प्रचार सभा.
शिवाजी पवार , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर काश्मीरमध्ये अदानी यांना लिथीयम उत्पादनासाठी जमिनींची विक्री करण्यात आली, असा आरोपी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.
शिर्डी मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी रात्री येथील थत्ते मैदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार नितीन देशमुख, आमदार सुनील शिंदे, आमदार लहू कानडे उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ३७० कलम हटवले हा खोटा प्रचार आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांचे प्रश्न कायम आहेत. पंतप्रधान मोदी हे तेलंगणात जाऊन माझ्यावर नकली संतान असल्याची टीका करत आहेत. माझ्या देवताससमान आई वडिलांचा त्यांनी अपमान केला आहे. हा अपमान मी कदापि सहन करणार नाही.
भाजप चारशे पारचा नारा देत आहेत. त्यांचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडविली तेच लोक संविधान बदलण्याचे बोलत आहेत. आमचे हिंदुत्व हे चुली पेटवणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचे सांगितले. केंद्र व भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असे ते म्हणाले.