बनावट व्यक्ती उभी करून जागेची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:00+5:302021-02-07T04:20:00+5:30
श्रीगोंदा : बनावट व्यक्ती उभी करून बनावट आधारकार्डद्वारे जागेची विक्री करून नगरच्या एक व्यापाऱ्यास तब्बल दीड कोटी रूपयांना फसविल्याची ...
श्रीगोंदा : बनावट व्यक्ती उभी करून बनावट आधारकार्डद्वारे जागेची विक्री करून नगरच्या एक व्यापाऱ्यास तब्बल दीड कोटी रूपयांना फसविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत रावसाहेब कोल (वय ४५, स्टेशन रोड, मल्हार चौक, अहमदनगर) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ कोटी ५५ लाख २१ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाल्याचे कोल यांनी म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल संपत वाघमारे (रा. कोळगाव), रवी संजय ढवळे (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा), विश्वजित रमेश कासार (रा. वाळकी ता. नगर), सनिल फक्कड आडसरे (पत्ता माहीत नाही), बनावट अनोळखी इसम (अपर्णा आनंद शेजबळ यांचे जागी उभी केलेली व्यक्ती), बनावट इसम (आनंद केशव शेजवळ यांच्या जागी उभा केलेला) दोन्ही रा. काळकाई चौक श्रीगोंदा, इंद्रजित रमेश कासार (रा. वाळकी, ता.नगर), कोमल विश्वजित कासार (रा. वाळकी, ता. नगर) या आठ जणांवर फसवणुकीसह विविधे गुन्हे शुक्रवारी रात्री श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
वरील आरोपी यांनी सूर्यकांत कोल यांचा प्रारंभी विश्वास संपादन केला. आनंद केशव शेजवळ (रा. कळबादेवी, मुंबई) यांची ९ हेक्टर ८९ आर एवढी जमीन विक्रीस असल्याचे कोल यांना सांगितले. त्यांनी जागेची पाहणी करून हा व्यवहार करण्याचे ठरविले. खरेदीखत करण्याचे ठरल्यानंतर वरील आरोपींनी शेजवळ यांच्या जागी खरेदीखतासाठी बनावट व्यक्ती उभी केली. त्यांचे आधारकार्डदेखील बनावट तयार करून ते सोबत जोडले. सुरुवातीला खरेदीखत ९ हेक्टर ८९ आरचे तयार करून त्यावर कोल यांची सही घेतली.
कोल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर आरोपींनी खरेदीखताची कागदपत्रे बदलून २० गुंठ्याचेच खरेदीखत तयार केले. ९ हेक्टर ८९ आर क्षेत्राचे पैसे घेऊन २० आर एवढेच क्षेत्र तेही बनावट व्यक्तीद्वारे देऊन बनवेगिरी केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित माळी करत आहेत.