‘लोकमत’चा शहिदांना सलाम; शूरा आम्ही वंदिले! सैनिकांच्या सन्मानार्थ विशेषांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:00 AM2018-08-14T11:00:43+5:302018-08-14T11:00:51+5:30
देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे.
अहमदनगर : देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे. यानिमित्त ‘लोकमत’ व रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी लढताना नगर जिल्ह्यातील अनेक जवान शहीद झाले. या सर्व शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा मी वंदिले’ या विशेषांकाची निर्मिती केली आहे. या विशेषांकात या शूर वीरांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. विशेषांकातून या शौर्यकथा १४ ते १८ आॅगस्ट या कालावधीत वाचकांच्या भेटीला येणार आहेत.
वर्धापनदिन समारंभात झाडांची रोपे आणण्याचे आवाहन
सालाबादप्रमाणे १५ आॅगस्टला ‘लोकमत’भवनच्या हिरवळीवर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ‘लोकमत’चा वर्धापनदिन समारंभ साजरा होणार आहे. या समारंभात कुठल्याही भेटवस्तू आणू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. भेटवस्तूंऐवजी झाडांची रोपे आणावीत. ही रोपे शहीद जवानांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या गावांना भेट देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ राबविणार आहे.
‘रेणुकामाता’ शहिदांच्या कुटुंबीयांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवणार
‘लोकमत’च्या ‘शूरा मी वंदिले’ या उपक्रमाचे रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी स्वागत केले. देशासाठी बलिदान दिलेल्या या जवानांच्या स्मृतींना ‘लोकमत’मुळे उजाळा मिळणार आहे. या जवानांच्या परिवारांची काळजी घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्यामुळे आपण आपल्या संस्थेतील पाच टक्के जागा या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी यापुढे राखीव ठेवणार असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.