संभाजी ब्रिगेडची श्रीगोंद्यात साखरेविरुद्ध भाकरीची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 11:38 AM2019-10-07T11:38:06+5:302019-10-07T11:39:18+5:30
‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे.
श्रीगोंदा : ‘साखरेविरुद्ध भाकरीची लढाई’ असा नारा देत संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा मतदारसंघात निवडणुकीत उतरली आहे. टिळक भोस यांनी ऊस उत्पादकांच्या थकबाकीसाठी गत ७९ दिवसांपासून बबनराव पाचपुते व राहुल जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले आहे. आता त्यांनी थेट निवडणुकीतच पाचपुते यांना आव्हान दिले आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते यांच्याविरोधात राष्टÑवादीकडून उमेदवारी कोण करणार? याची मोठी चर्चा रंगली. नागवडे यांची भूमिका भाजपला अनुकूल असल्याचे समजताच राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. नागवडे यांनीही दोन्ही काँग्रेसकडून उमेदवारी केली नाही. त्यामुळे ऐनवेळी घनश्याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. अनुराधा नागवडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्या रिंगणात राहतील की नाही हे नक्की नाही. त्यांनी माघार घेतल्यास पाचपुते व शेलार हे प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात राहतील.
या सर्वांना पर्याय म्हणून भोस हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार उभे केले होते. तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या थकीत पेमेंटबाबत एकही नेता बोलत नाही. पाणी, रोजगार, फळबागा याचा प्रश्न आहे. यावर्षी अनेक शेतक-यांना चारा छावणीत दिवस काढावे लागले. टँकरचे पाणी प्यावे लागले. या मुद्यांकडे ते गावोगावच्या सभांमधून लक्ष वेधत आहेत. आम्ही साखर कारखानदार नाहीत. आमच्याकडे पैसा नाही. आमची लढाई भाकरीची आहे, अशी भूमिका घेऊन ते मैदानात उतरले आहेत.
श्रीगोंदा तालुका प्रस्थापित नेत्यांनी वेठीस धरला आहे. हे नेते नेहमी वैयक्तिक हितासाठी तडजोडी करतात. जनतेला यांनी गृहित धरले आहे. त्यामुळे सामान्य शेतक-याचा मुलगा व जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उतरलो आहे, असे संभाजी ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले.