नगरमधून आणखी १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:08 PM2020-03-14T16:08:14+5:302020-03-14T16:08:36+5:30
अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता या रूग्णाच्या संपर्कातील ८ व अन्य ८ अशा एकूण १६ जणांच्या थुंकीचे व रक्ताचे नमुने प्रशासनाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले आहेत.
नगरमध्ये दुबईहून आलेल्या चौघांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. तर उर्वरित तिघांचे नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारी या कोरोनाबाधीत रूग्णाची माहिती प्रशासनाने जाहीर केली. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. दूबईहून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या थेट संपर्कात चार जण, तर दूरच्या संपर्कात चार जण आले होते. याशिवाय इटलीहून आलेला एकजण व त्याच्या संपर्कातील तिघे आणि जिल्हा रूग्णालयात स्वत:हून तपासणीसाठी आलेले चौघे अशा एकूण १६ जणांचे नमुने पुण्याला एनआयव्हीकडे पाठवले असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.
रूग्णाला बूथ हॉस्पिटलमध्ये हलवले
दरम्यान, कोरोनाबाधीत रूग्णाला जिल्हा रूग्णालयातून बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण केंद्रात हलवले आहे. १६ पैकी ४जण थेट रूग्णाच्या थेट संपर्कात होते. त्यांचे नमुने घेऊन त्यांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. तर उर्वरित १२ जणांना त्यांच्या घरी निगरानीखाली ठेवले आहे.
..तर रूग्णाला डिस्चार्ज
कोरोनाबाधीत रूग्णाला सर्दी, खोकल्यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत. तो ठणठणीत आहे. परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो आरोग्या विभागाच्या देखरेखीखाली आहे. आणखी सात दिवसांनी पुन्हा या रूग्णाचे थुंकीचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्यात अहवाल निगेटीव्ह आला तर रूग्णाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली.