ग्रामपंचायतीच्या निकालानंतर गावात सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:46+5:302021-01-20T04:21:46+5:30
सोमवारी दुपारी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मतगणना करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. निवडणुकीचा कौल ...
सोमवारी दुपारी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मतगणना करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. निवडणुकीचा कौल मिळतात इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी अंगावर गुलाल घेत आनंद साजरा केला. त्यानंतर गावोगाव मिरवणुका काढण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांना सर्वांनीच केराची टोपली दाखविली.
मुठेवाडगाव येथे बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मोठे यांच्या ग्राम विकास मंडळाने नऊ पैकी पाच जागांवर यश मिळवत सत्ता कायम ठेवली. त्यांचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. त्यांच्याविरोधात अशोक साखर कारखान्याचे संचालक व भाजप तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला चार जागा मिळाल्या.
विश्वनाथ मुठे यांनी सत्ता मिळवली तरीही त्यांच्या भावजयी गायत्री यांचा मात्र पराभव झाला. गावातील त्यांचे सहकारी ग्रामविकास मंडळाचे नेते रघुनाथ मुठे यांचे चिरंजीव प्रकाश यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे बबनराव मुठे यांनी प्रारंभी एकतर्फी वाटणार्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली. ते भाजप नेते राम शिंदे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे खंदे समर्थक आहेत.
............
गड आला पण सिंह गेला
विश्वनाथ मुठे व रघुनाथ मुठे यांच्या कुटुंबातील उमेदवाराचा पराभव झाल्याने त्यांना आनंदोत्सव साजरा करता आला नाही. गड आला पण सिंह गेला अशी त्यांची अवस्था झाली. गावात निकालानंतर सामसूम आहे. बबनराव मुठे यांना सत्ता खेचण्यात अवघी एक जागा कमी पडली. मात्र निकालावर ते समाधानी आहेत. मात्र तरीही सत्तेपासून दूर राहिल्यामुळे त्यांनी गुलाल घेतला नाही. निवडणुकीपूर्वी गावात असलेली धामधूम निकालानंतर शांततेत विरली आहे.
---------