चंदन तस्करांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:52+5:302021-03-23T04:21:52+5:30
शीतल उर्फ सीताराम उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे (वय ३२), करण विजय कुऱ्हाडे (वय २५, दोघेही रा. चितळी स्टेशन, ता. ...
शीतल उर्फ सीताराम उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे (वय ३२), करण विजय कुऱ्हाडे (वय २५, दोघेही रा. चितळी स्टेशन, ता. राहता), परमेश वैश्या भोसले (वय २६, रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), सतीश मच्छिंद्र शिंदे (वय ३२, रा.), संतोष मारुती शिंदे (वय ३२, रा. दोघे बोल्हेगाव, अहमदनगर) व गणेश विष्णू गायकवाड (वय २६, रा. गंगापूर) असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. या टोळीने ३० डिसेंबर २०२० रोजी कोपरगाव येथील कोल्हेवस्ती येथून चंदनाचे झाड चोरून नेले होते. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात घनश्याम पोपट नेटके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. तसेच नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथूनही चंदनाचे झाड चोरीला गेले होते. चंदन चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी या टोळीच्या तपासासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. त्यानुसार तपास करत पथकाने सहा आरोपींना जेरबंद केले. या आरोपींकडून १६ किलो वजनाची चंदनाची लाकडे व कार असा एकूण ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी चोरलेले चंदन हे नेवासा तालुक्यातील चांदा येथील बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड याला विक्री करणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी गायकवाड याचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्ता इंगळे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, सुरेश माळी, जालिंदर माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
......
आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
पोलिसांनी अटक केलेल्या चंदन तस्करांवर श्रीरामपूर, राहाता, सातपूर, गंगापूर, नाशिक, कोरेगाव, एमआयडीसी, तोफखाना, नेवासा, पंचवटी आदी पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.