अनामप्रेम संस्थेची संध्या सूर्यवंशी ही महाविजेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:25+5:302021-08-29T04:22:25+5:30
अहमदनगर : ‘केअर फॉर यू’ या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व अनाथाश्रमातील बालकांसाठी ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ या ...
अहमदनगर : ‘केअर फॉर यू’ या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व अनाथाश्रमातील बालकांसाठी ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ या राज्यस्तरीय गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत येथील अनामप्रेम संस्थेतील संध्या सूर्यवंशी ही महाविजेती ठरली, तर अनामप्रेम या संस्थेची साक्षी नरवडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
पिंपरी चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात मंगळवारी ही स्पर्धा झाली. केअर फॉर यू संस्थेच्या पायल सारडा-राठी, रोशन राठी यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा झाली. गाण्याच्या या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या ठरल्या. अंतिम १२ गायकांमधून नगरच्या अनामप्रेम संस्थेची संध्या सूर्यवंशी ही महाविजेती ठरली. नगरच्या स्नेहालय संस्थेची साक्षी नरवडे ही द्वितीय तर पुण्याच्या मावळ येथील संपर्क बालग्राम संस्थेची चैताली साक्रीकर तृतीय विजेती ठरली. विजेत्यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महिला व बाल विभागाचे आयुक्त राहुल मोरे, सिल्वर ग्रुपचे डिरेक्टर संतोष बारणे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. या महाअंतिम सोहळ्याचे परीक्षण गायिका वैशाली सामंत, गायक शादाब फरिदी आणि अल्तमाश फरिदी यांनी केले.
जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातील ५ प्रमुख केंद्रांवर या स्पर्धेची प्रवेशफेरी झाली. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध शहरातील अनाथाश्रमातून शेकडो मुले सहभागी झाली होती. पहिल्या फेरीत त्यापैकी ४७ गायकांची निवड झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतून १२ गायक महाअंतिम फेरीसाठी निवडले गेले. या १२ गायकांना पाच महिने विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महाअंतिम सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या सर्व स्पर्धकांची पाच दिवस निवास, प्रशिक्षण व सरावाची व्यवस्था पिंपरी चिंचवड शहरात केली होती. संस्थेच्या ट्रस्टी स्मिता सारडा यांनी वैयक्तिक लक्ष घालून सहकार्य केले.
महाअंतिम सोहळ्याचे १२ महागायक, ३ महाविजेते आणि ज्या संस्थेमधून जे गायक आले होते त्या १२ संस्था यांना बक्षीस तसेच मदत स्वरुपात जवळपास दीड लाखाची पारितोषिके देण्यात आली.
-----
फोटो: २८संध्या सूर्यवंशी
राज्यस्तरीय गाण्याच्या स्पर्धेत महाविजेती संध्या सूर्यवंशी हिला बक्षीस देताना पार्श्वगायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश. समवेत आयुक्त राहुल मोरे व संतोष बारणे, सी. ए. पायल सारडा राठी, सी.ए. रोशन राठी आदी.