संगमनेर : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात सेनेची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 05:19 PM2019-05-24T17:19:13+5:302019-05-24T17:23:13+5:30

shirdi Lok Sabha Election Results 2019

Sangamner: Sena lead by balasaheb thorat home ground | संगमनेर : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात सेनेची मुसंडी

संगमनेर : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात सेनेची मुसंडी

शेखर पानसरे

संगमनेर : संगमनेरात कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होऊनही त्याचा प्रभाव दिसून आला नाही. संगमनेर मतदारसंघात ७ हजार ६२५ मतांनी सेनेचे सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी धक्कादायक मानली जाते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी विखेंच्या राजकीय भूमिकेने जिल्ह्यातील वातावरण ढवळलेले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांसह मतदारांमध्येही संभ्रम होता. मात्र, डॉ.सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर तो दूर झाला. विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखेंचे नाव कॉँग्रेसच्या स्ट्रार प्रचारकांमध्ये असूनही ते प्रचारापासून दूर राहिले. विखेंच्या या भूमिकेचा फायदा घेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा पुढे केला. दक्षिण व उत्तरेत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावत विखे विरोधी नेत्यांची त्यांनी मोट बांधत जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही ठरले. त्यातच राष्टÑवादीने दक्षिणेत संग्र्राम जगतापांसारखा तगडा उमेदवार दिल्याने राधाकृष्ण विखे व त्यांची यंत्रणा डॉ.विखेंच्या विजयासाठी अंकगणित जुळविण्यात अडकून पडली. याचा फायदा आमदार थोरातांनी घेत उत्तरेत सर्व तालुक्यांमध्ये आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा जोरदार प्रचार करीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
शिर्डी मतदारसंघात बदल घडेल असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक हळूहळू रंगतदार होत गेली. संगमनेरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा झाल्याने त्यांचा फायदा लोखंडे यांना झाला. ‘सुजय आल्याने विजय पक्का’ असे सूचक विधानही ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेरात सभा झाल्यानंतर चित्र पुन्हा बदलले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून कांबळे हे मोठी आघाडी घेतील असे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे. मोदी लाटेचा लोखंडे यांना फायदा मिळाला. थोरात यांना ही लाट थोपविता आली नाही. गतवेळीही संगमनेरमधून लोखंडे यांनाच २६ हजाराचे मताधिक्य होते. यावेळी ते मताधिक्य घटले.

की फॅक्टर काय ठरला?
अहमदनगर दक्षिणेकडील मतदान झाल्यानंतर विखेंची यंत्रणा उत्तरेत लोखडेंच्या विजयासाठी कामाला लागली.
संगमनेरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा झाल्याने त्यांचा फायदा लोखंडे यांना झाला.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही प्रभाव दिसेल असे वाटत असताना तो कुठेही दिसला नाही. एकूणच विखेंनी अखेरच्या क्षणी भाकरी फिरविल्याने लोखंडे यांचा विजय झाला.

संगमनेरात थोरातांपुढे विखेंचे आव्हान
अहमदनगरमध्ये डॉ.सुजय विखे व शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे भरघोस मतांनी विजयी झाले. राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर ते संगमनेर विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करतील. संगमनेर तालुक्यातील २६ गावे राहाता विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या गावांमध्ये आमदार थोरातांचे वर्चस्व आहे. तेथेही ते विखेंविरोधात भूमिका घेतील. त्यामुळे विखे व थोरात हा संघर्ष विधासभेच्या निवडणुकीत पहायला मिळेल.

विद्यमान आमदार
बाळासाहेब थोरात। काँग्रेस

 

Web Title: Sangamner: Sena lead by balasaheb thorat home ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.