संगमनेरात जळीतकांड; मध्यरात्री अज्ञाताने विविध भागातील तीन वाहने जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:30 AM2022-05-13T11:30:25+5:302022-05-13T11:30:35+5:30
संगमनेर शहरात विविध भागात अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा ही वाहने पेटविल्याची घटना घडली आहे.
संगमनेर( जि. अहमदनगर) : संगमनेर शहरात विविध भागात अज्ञातांनी घरासमोर उभी असलेली दोन दुचाकी व एक ऑटो रिक्षा ही वाहने पेटविल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री दोन ते तीन वाजलेच्या सुमारास घडली. गतवर्षी संगमनेर नगर परिषदेच्या क्रीडांगण समोरील अभंग मळा परिसरात अशीच घटना घडली होती. अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकी अशी एकूण तीन वाहने पेटवून दिली होती. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
शहरातील विविध भागात सिरीयल पद्धतीने मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन दरम्यान अज्ञातांनी वाहने पेटविली. घोडेकरमळा येथील जय तपेंद्रबहादुर सूनार यांची घरासमोरील ज्युपिटर दुचाकी (एम.एच.१७ सी.एल.७२४२) पेटविली. सुनार यांना परिसरातील नागरिकांनी कळविल्यानंतर घरातील सदस्यांनी दुचाकीची आग विझविली. तोपर्यंत दुचाकीचे जळून मोठे नुकसान झाले. त्याच दरम्यान सुनार यांचे अकोले नाका येथील मित्र कपिल दिलीप शिंदे यांची ऑटो रिक्षा (एम.एच.१७ एन. १११७) व जेधे कॉलनी येथील आकाश बाळू जेधे यांची दुचाकी (क्र. एम.एच.१७ बी. डब्लु. ४८२४) अज्ञातांनी पेटविली.यात आॅटोचे जळून मोठे नुकसान झाले.
शहरात वाहने पेटवून देण्याची ही दुसरी घटना आहे. दुचाकी चोरणे किंवा दुचाकीमधील इंधन चोरण्याचे प्रकार यापूर्वी घडत आले आहेत. पण वाहने जाळण्याची घटना घडत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी जय तपेंद्रबहादुर सूनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक खाडे हे करीत आहेत.