संगमनेरात अवैध धंद्यांबरोबरच गांजाच्या व्यसनात अडकली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:30+5:302021-04-05T04:19:30+5:30
इतर अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त असलेला गांजा शहर व परिसरात अगदी सहज मिळतो. सिगारेट ओढण्याचे व्यसन लागलेली महाविद्यालयीन मुले ...
इतर अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त असलेला गांजा शहर व परिसरात अगदी सहज मिळतो. सिगारेट ओढण्याचे व्यसन लागलेली महाविद्यालयीन मुले गांजा ओढण्याच्या आहारी जात आहेत. अल्पवयीन मुलांनाही गांजाची पुडी, सिगारेट उपलब्ध होते. त्यामुळे या व्यसनाच्या दरीत सर्वच वयोगटातील मुले ढकलली जात असल्याची बाब चिंताजनक आहे. गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय मुळासकट संपवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अहमदनगर, पुणे, मुंबई येथील पोलिसांनी यापूर्वी केलेल्या गांजा जप्तीच्या कारवाईत संगमनेरातील काहींची नावे समोर आली होती. गांजाची तस्करी, विक्री करणाऱ्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संगमनेरात गांजा तस्करी व विक्रीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. गांजा विक्रीचा अवैध व्यवसाय संगमनेर शहर व परिसरात चांगलाच फोफावला असल्याचे पोलिसांच्या कारवाईतूनच समोर आले. अवैध धंद्यांबरोबरच गांजा ओढण्याच्या व्यसनात तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे.
प्रवरा, म्हाळुंगी नदीपात्रातील वाळू अवैधरीत्या वाहनांमधून वाहिली जाते. या माध्यमातून बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेक जण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. अनेकांना गांजाचे व्यसन जडले असून, यात अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. ऐंशी ते शंभर रुपये दिल्यानंतर त्यांना गांजाची पुडी, पंधरा ते वीस रुपयांना गांजाची सिगारेट अगदी सहज उपलब्ध होते. या व्यसनात महाविद्यालयीन मुलेही अडकली आहेत. आडोशाला जाऊन गांजाने भरलेली सिगारेट ओढणे सोपे असल्याने या सिगारेटची मागणी ते करतात. गाजांची सिगारेट पुरविणाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय असू शकते. चिलीममधून गांजा ओढण्यासाठी प्रवरा, म्हाळुंगी नदीचा परिसर, मोकळ्या जागा, पालिकेचे संकुल, उद्याने अशी ठिकाणे ठरलेली आहेत. गांजा विक्रीची ठिकाणे लोकवस्तीत असून, येथे गांजा घ्यायला येणाऱ्या अनोळखी लोकांचा दिवस-रात्र वावर असतो. गांजामुळे तरुणपिढी व्यसनाधीन होत असून, यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे.
-------------
गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे मुलांचे जीवन बरबाद होत आहे. गांजाचे व्यसन जडलेल्या महाविद्यालयीन, अल्पवयीन मुलांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आम्ही पोलिसांना गांजा विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती देऊ. कारवाईत केवळ दिखावा नकोय.
विकास डमाळे, उपशहरप्रमुख, शिवसेना, संगमनेर.