संगमनेरचा पठारभाग सौम्य भूकंपप्रवण रेषेवर : ‘मेरी’चा दावा
By सुधीर लंके | Published: August 26, 2018 12:52 PM2018-08-26T12:52:11+5:302018-08-26T12:52:17+5:30
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे धक्के हानीकारक नसल्याने नागरिकांनी घाबरु नये, असेही आवाहन या संस्थेने केले आहे.
संगमनेर तालुक्यात पुण्याकडे जाताना नाशिक-पुणे महामार्गालगत डोंगराळ परिसर आहे. त्याला पठार भाग म्हणून ओळखले जाते. या भागात गत दहा दिवसात घारगाव, बोरबन, कोठे, माळेगाव पठार, आंबीखालसा, नांदूर खंदरमाळ या परिसरात जमिनीतून तीनदा मोठा आवाज होऊन नागरिकांना कंप जाणवला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता नांदूर येथे एका घराला तडे गेले आहेत. ‘लोकमत’ टीमने आज या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
गत दोन-तीन वर्षांपासून या परिसरात असे धक्के जाणवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गत आठवड्यातील दोन धक्के रात्री तर एक सकाळी जाणवला. यातील दोन धक्क्यांची ‘मेरी’या संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर २.८ व २.५ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हे भूकंपाचे धक्के असल्याचे ‘मेरी’च्या शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक नागरिकांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रात्री धक्का बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत सुटले, अशी माहिती घारगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिक भयभीत असल्याने नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, प्रशासनाकडून प्रभावी दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांनी जुन्या व मोडकळीस आलेल्या घरात राहू नये, अशा केवळ नोटिसा प्रशासनाने पाठविल्या असल्याचे खंदरमाळवाडीचे उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी सांगितले. हा भूकंपच आहे की आणखी काही याबाबतही नागरिक संभ्रमात दिसले.
प्रशासनाचे दुर्लक्ष
शुक्रवारी रात्री नांदूर येथील सुभाष सुपेकर यांच्या घराला तडा गेला आहे. प्रशासनाला कळविल्यानंतरही शनिवारी दिवसभर कुणीही याबाबत पंचनामा करण्यासाठी आलेले नव्हते. साधे तलाठीही फिरकले नाहीत, अशी खंत या कुटुंबातील महिला अर्चना सुपेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली. या घरात वीट बांधकाम असलेल्या सिमेंटच्या भिंतीला आरपार तडा गेला आहे. इतरही काही छोट्या भेगा पडल्या आहेत.
डहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषा
डहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे. या रेषेवर येणारी गावे ही सौम्य भूकंपप्रवण प्रदेशात मोडतात. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसर या रेषेवर येत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. हे भूकंपाचे धक्के आहेत. मात्र, हा अत्यंत सौम्य भूकंप आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. असे धक्के काही दिवस जाणवतात व नंतर बंदही होतात. बऱ्याचदा जमिनीतील ऊर्जा बाहेर पडण्यासाठी असे धक्के मदतही करतात. त्यामुळे एकदम मोठा भूकंप होण्याची शक्यता टळते. या परिसरात १९९५, १९९८, २०११, २०१७ मध्येही असे धक्के जाणवलेले आहेत. - चारुलता चौधरी, वैज्ञानिक अधिकारी, मेरी, नाशिक.
‘मेरी’ची टीम आज घारगावमध्ये
‘मेरी’ (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक) ही संस्था भूकंपाबाबत अभ्यास करणारी नोडल एजन्सी आहे. या संस्थेचे पथक शनिवारी घारगाव परिसराची पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही ‘लोकमत’ला ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यायची, याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना प्रात्यक्षिक दिले जाणार असल्याचेही द्विवेदी म्हणाले.