संग्राम जगताप यांनी राखला नगरचा गड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 04:20 PM2019-10-25T16:20:12+5:302019-10-25T16:20:55+5:30
आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.
अहमदनगर मतदारसंघ विश्लेषण - अण्णा नवथर ।
अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़.
गत विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत संग्राम जगताप यांनी बाजी मारली़. २५ वर्षे आमदार राहिलेल्या अनिल राठोड यांना आस्मान दाखविले़. लोकसभा निवडणूक जगताप यांनी भाजपचे डॉ़. सुजय विखे यांच्याविरोधात लढविली़. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला़. तेव्हापासूनच त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली़. ‘विकासासाठी वन्स मोअर’, हा मुद्दा जोरकसपणे ते निवडणुकीत मांडत राहिले़. सेनेने गुंडगिरी आणि भयमुक्त नगरसाठी उमेदवारी, हा जुनाच मुद्दा पुढे आणला़. भयमुक्त नगर, यापेक्षा नगरकरांनी यावेळी विकासाला साथ दिली़. जगताप यांना मध्यवर्ती शहर वगळता, सर्वच ठिकाणाहून कमी अधिक प्रमाणात मताधिक्य मिळाले़. होम टू होम प्रचार करत जगताप यांनी राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले़. महापालिका निवडणुकीतही जगताप यांनी भाजप लाटेतही लक्षणीय विजय मिळविला़. लोकसभेत सेनेने शहरात विखे यांचे काम केले़. त्यामुळे विधानसभेत खासदार विखे आणि शहर भाजप, यांचे सेनेला बळ मिळाले़. परंतु, संग्राम जगताप व वडील अरुण जगताप यांच्यापुढे विखे यांची यंत्रणा कमी पडली़.
संग्राम जगताप हे सेनेकडून की भाजपकडून, असा संभ्रम शेवटपर्यंत राहिला़. सेनेत कधी नव्हे ते यावेळी इच्छुकांची संख्या वाढली़. उमेदवारी कुणाला, यातच सेना गुरफटली गेली. तोपर्यंत जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली होती़. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या़ पण, ते नगरमध्ये आले नाहीत़. पक्षाच्या नेत्याची एकही सभा न घेता निवडून येणारे जगताप हे जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत़. संग्राम जगताप यांनी संकल्पनामा जाहीर केला व तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांपर्यंत पोहोचविला़. प्रचारात राष्ट्रवादी आघाडीवर होती़. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता़. तसा सेनेच्या गोटात दिसला नाही़. नेहमीप्रमाणे सेनेचे सर्वच नेते प्रचारात कमीच दिसले़.