संग्राम जगताप यांच्या भाजप भेटीने संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:25+5:302021-05-24T04:20:25+5:30

अहमदनगर : भाजपच्या गांधी मैदान येथील संपर्क कार्यालयात रविवारी दुपारी नगरसेवकांची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादीचे ...

Sangram Jagtap's visit to BJP raises suspicions | संग्राम जगताप यांच्या भाजप भेटीने संशयकल्लोळ

संग्राम जगताप यांच्या भाजप भेटीने संशयकल्लोळ

अहमदनगर : भाजपच्या गांधी मैदान येथील संपर्क कार्यालयात रविवारी दुपारी नगरसेवकांची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे भाजप पक्ष कार्यालयात आगमन झाले. त्यांनी सुमारे आर्धा तास भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच जगताप यांनी ही राजकीय भेट नव्हती. वैयक्तिक कामानिमित्त आलो असल्याचे पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

महापौरपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू आहेत. महापौर निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी अचानक भाजप कार्यालयात जाऊन नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष भय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह भाजपचे १५ नगरसेवक आदी उपस्थित होते. भाजपची ही पूर्वनियोजित बैठक होती. आमदार जगताप हे अचानक पक्ष कार्यालयात आल्याने नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या. सुमारे आर्धा तास जगताप भाजप पक्ष कार्यालयात हाेते. पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जगताप म्हणाले की, येथून चाललाे होतो. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा फोन आला. महापौरांकडे वैयक्तिक काम असल्याने काही वेळासाठी आलो होतो. तुम्ही समजता तसे काहीही नाही. गैरसमज करून घेऊ नका. माझ्याकडे शिवसेना, काँग्रेस, भाजप, बसपाचेही नगरसेवक येत असतात. आपणही त्यांच्याकडे जात असतो. नगरसेवकांकडून कामाची मागणी केली जाते. त्यादृष्टीने इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी सुरू असतात. त्याचा असा वेगळा अर्थ काढू नये. या बैठकीत महापौरपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जगताप म्हणाले की, निवडणुकांविषयीच्या चर्चा अशा उघडपणे होत नसतात. महापौरपदाच्या निवडणुकीला वेळ आहे. योग्य वेळी निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.

....

खासदार विखेंनी घेतली फोनवरून माहिती

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनाही मिळाली. त्यांनीही याबाबत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतल्याचे समजते.

..

Web Title: Sangram Jagtap's visit to BJP raises suspicions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.