सांगवी ग्रामस्थ-वाळू तस्करांमध्ये संघर्ष पेटला; भोयटे यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:12 AM2017-11-08T11:12:30+5:302017-11-08T11:18:53+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला ग्रामस्थ व वाळू तस्करांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या वादातूनच एका वाळू तस्कराने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भोयटे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.
काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला ग्रामस्थ व वाळू तस्करांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या वादातूनच एका वाळू तस्कराने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश भोयटे यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. भोयटे यांच्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवीतील वाळू तस्करी बंद करावी म्हणून सांगवीचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी अभय महाजन यांना बुधवारी भेटणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी योगेश भोयटे व काही ग्रामस्थांनी भीमा नदीतून बेकायदेशीरपणे भरलेल्या तीन ट्रक अडविल्या. तुम्ही यापुढे गावातून वाहतूक वाहतूक करू नका, गावातील रस्ते खराब झाले आहेत, शालेय मुलांना जाणे अवघड झाले आहे, असे सांगत भोयटे यांनी वाळू वाहतुकीला विरोध दर्शविला. ग्रामस्थांचा आक्रमक बाणा पाहून ट्रक चालक ट्रकसोडून खाली उतरले. मात्र दिनकर नलगे हा ट्रक (क्रमांक एम़ एच़ १२, ई़ यु़ १५३) मध्ये चालक म्हणून बसला आणि भरधाव वेगाने ट्रक योगेश भोयटे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
योगेश भोयटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनकर नलगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी, या मागणीसाठी सांगवीचे ग्रामस्थ आज (बुधवारी) जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेणार आहेत. गावातून अवैध वाळू वाहतूक करु देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.