अजनूजचा ‘तो’ वाळूसाठा प्रशासनाकडून बंद; अटी-शर्तींचा भंग, यंत्राने होत होता वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:36 PM2017-12-19T15:36:51+5:302017-12-19T15:45:18+5:30
न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्तींचा भंग करून अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे सुरू असलेला वाळूसाठा ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासनाने मंगळवारी बंद केला. येथे सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा सुरू होता.
अहमदनगर : न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्तींचा भंग करून अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे सुरू असलेला वाळूसाठा ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासनाने मंगळवारी बंद केला. येथे सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा सुरू होता.
जिल्ह्यात तीन ठिकाणच्या वाळूसाठ्यांचे लिलाव झाले आहेत. यात अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे ६ हजार ३६० ब्रासचा ठेका पुण्याच्या एका ठेकेदाराने घेतला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा करता येत नाही, तसेच उपशासाठी यंत्रही वापरता येत नाही. मात्र या नियमाला तिलांजली देत अजनूज येथे राजरोसपणे सक्शन मशीन व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेत मंगळवारी सकाळी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी मंडलाधिकारी, तलाठी यांचे पथक अजनूज येथे पाठवून या ठेक्यावरील वाळूउपसा बंद करण्याचे आदेश दिले. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून वाळूउपसा करताना अटी व शर्तींचा भंग झाला आहे का, याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई होणार असल्याचे माळी म्हणाले. दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनीही असा नियमबाह्य उपसा होत असेल तर संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे म्हटले होते. आता प्रशासन या प्रकरणी ठेकेदारावर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी हे मंगळवारी सायंकाळी अजनुज येथील वाळू साठ्यांची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत़