मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावणारा संजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:29 PM2019-11-17T15:29:10+5:302019-11-17T15:29:59+5:30
कुकाणा परिसरातील मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावून जाणा-या संजय वाघ यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे.
सुनील पंडीत ।
कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरातील मनोरुग्ण, अनाथांच्या मदतीला धावून जाणा-या संजय वाघ यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी येथील एका मनोरुग्ण महिलेला डॉ. राजेंद्र धामणे यांच्या माउली सेवा प्रष्ठिानच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळवून दिला.
संजय वाघ हे जानेवारी २०१८ पासून ‘एक दिवस समाज सेवे’साठी हा मंत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. वंचित, गोरगरीब, मनोरुग्ण, अनाथ व आश्रम शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी अनेक अनाथांची मोफत दाढी-कटींग करून दिली आहे. अनेक मनोरुग्ण, इतरत्र भटकणारे यांना आंघोळ घालून त्यांना नवे कपडे देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. यंदाच्या दिवाळीत त्यांनी कुकाणा परिसरातील लष्करी जवानांसाठी नवा उपक्रम राबविला. लष्करात असलेले व सध्या सुटीवर आलेल्या जवानांची त्यांनी मोफत दाढी-कटींग करून दिली.
गेल्या काही दिवसांपासून कुकाणा बसथांबा परिसर व गावात एक मनोरुग्ण महिला फिरत होती. वाघ यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी अहमदनगर येथील माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क केला व संबंधित महिलेची माहिती दिली. डॉ. धामणे यांनी त्या महिलेला येथे घेऊन या असे सांगितले. त्यानंतर वाघ यांनी मित्र परिवाराच्या मदतीने त्या महिलेस माउली सेवा प्रतिष्ठान आश्रम येथे डॉ. धामणे यांच्या स्वाधीन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम कदम, संदीप बेळगे, जयवंत मोटे, लखन गरड, कचरू लिंगायत आदी उपस्थित होते. या सामाजिक कार्यासाठी सिद्धार्थ कावरे, राम वाबळे, ग्रामसेवक संजय वाघ, किरण राऊत, महेश सावंत, तुषार कल्हपुरे, महावीर पटवा, तोफिक इनामदार, अरुण फोलाणे, डॉ. ज्ञानदेव गरड, रामेश्वर तुपे यांनी आर्थिक सहकार्य केले.