अवैध वाळू उपशामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांवर संक्रांत; मंडलाधिकारी, तलाठी निलंबित

By शिवाजी पवार | Published: January 18, 2024 03:18 PM2024-01-18T15:18:11+5:302024-01-18T15:18:42+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तलाठी कर्मचारी बेमुदत संपावर

Sankrant on revenue officials due to illegal sand mining; Divisional Officer, Talathi suspended | अवैध वाळू उपशामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांवर संक्रांत; मंडलाधिकारी, तलाठी निलंबित

अवैध वाळू उपशामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांवर संक्रांत; मंडलाधिकारी, तलाठी निलंबित

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठी यांना अवैध वाळू उपशाविरुद्धच्या कारवाईत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री हे आदेश पारित केल्यानंतर श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील तलाठी कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. उंदिरगावचे मंडलाधिकारी बाळासाहेब वायखिंडे, नायगावचे तलाठी नंदकुमार नागापुरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी निलंबनाचे आदेश काढले. यातील वायखिंडे हे अवघ्या चार महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार होते. तलाठी नागापुरे यांच्याकडे मातुलठाण आणि नायगाव या दोन साजांचा पदभार होता. श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू उपशावरून अधिकाऱ्यांवर झालेली ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते.

जिल्हा गौण खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी शनिवारी मध्यरात्री गोदावरी नदीपात्रातील मातुलठाण परिसरामध्ये अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाई केली होती. यावेळी त्यांना वाळूचा हायवा मिळून आला होता. 

गोदावरी नदीपात्रातील नायगाव येथे सरकारी वाळू डेपो केंद्र आहेत. तेथूनच हा वाळू उपसा अवैधरीत्या सुरू होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती आहे. सातत्याने गोदावरी पट्ट्यातून वाळू तस्करी सुरू असली, तरी महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्याला प्रतिबंध घालण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.
 

Web Title: Sankrant on revenue officials due to illegal sand mining; Divisional Officer, Talathi suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.