नगर तालुक्यातील रब्बी पिकांवर ‘संक्रांत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:46+5:302021-01-18T04:18:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून ढगाळी वातावरण पसरल्याने नगर तालुक्यात यंदा कडाक्याची थंडी जाणवलीच नाही. थंडीच्या ...

'Sankrant' on rabi crops in Nagar taluka | नगर तालुक्यातील रब्बी पिकांवर ‘संक्रांत'

नगर तालुक्यातील रब्बी पिकांवर ‘संक्रांत'

लोकमत न्यूज नेटवर्क

केडगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून ढगाळी वातावरण पसरल्याने नगर तालुक्यात यंदा कडाक्याची थंडी जाणवलीच नाही. थंडीच्या अभावाने शेत पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला. सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे बहरात आलेल्या पिकांवर चिकटा, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. महागड्या औषधांच्या फवारण्या करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे.

नगर तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाचे सरासरी प्रमाण चांगले असल्याने गहू, हरभरा, कांदा, चारा पिके आदींचे क्षेत्र वाढले आहे. जिरायत क्षेत्रावर ज्वारीची पेर वाढली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी कमी पाण्यात अन् कमी दिवसांत भरघोष उत्पन्न देण्याच्या गव्हाच्या जातींची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. ज्वारी, हरभरा, गहू, कांदा पिकांच्या वाढीसाठी व पिके निरोगी होण्यासाठी कडाक्याची थंडी गरजेची असते. यावर्षी मात्र थंडीच गायब झाल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सतत निर्माण होणाऱ्या ढगाळी वातावरणामुळे ज्वारी पिकांवर चिकटा, गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी गव्हावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील बदल आणि रोगांमुळे ज्वारीचे सोनेरी दाणे काळवंडले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. या धास्तीने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे.

....

भाजीपाल्यांवरही रोगाचा हल्ला

शेतकरी रोजचा घरखर्च भागविण्यासाठी भाजीपाला, फळभाज्या यांचे उत्पादन घेत आहेत. परंतु वातावरणातील बदल या पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. दव पडल्याने भाजीपाल्यावर पांढरे डाग पडत आहेत. पाने पिवळी पडत आहेत. टमाटा, काकडी, दोडके यांची वाढ खुंटली असून, किडीचाही प्रादुर्भाव होत आहे. वाटाणा पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांवर महागडी औषध फवारणी करूनही वातावरण सतत बदलत असल्याने पिकांवर औषधांचा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ ओढावली आहे.

...

फोटो-१७ज्वारी पीक

..

Web Title: 'Sankrant' on rabi crops in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.