संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:23 AM2021-03-01T04:23:24+5:302021-03-01T04:23:24+5:30
पारनेर : कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी असणाऱ्या पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. ...
पारनेर : कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख संतांपैकी असणाऱ्या पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. केवळ ११ मानाच्या दिंड्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले, संत निळोबाराय समाधी सोहळ्याची महापूजा होईल. १६ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा हस्ते सपत्नीक व तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये समाधीची महापूजा होईल. दुपारी दोन वाजता पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर समाधी सोहळ्याचा समारोप होईल.
देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी बैठक पार पडली. संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीला विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, सेवा मंडळांचे पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रा स्थगित केली असली तरी समाधीपूजन तसेच इतर विधिवत कार्यक्रम होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, निळोबारायांचे अभंग गाथा पारायण, हरिपाठ, काकडा, कीर्तन, ५० ते १०० भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. १४ मार्च रोजी तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होईल. मानाच्या अकरा दिंड्यांनाच पिंपळनेरमध्ये प्रवेश मिळणार आहे.