संत निंबराज पालखी सोहळा : संततधार पावसात वैष्णवांचा मेळा मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:31 PM2019-06-25T16:31:57+5:302019-06-25T16:32:40+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील हजारो भाविक वारकरी संततधार पावसात संत निंबराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.
ज्ञानोबा - तुकोबाच्या जयघोषात तल्लीन होऊन देहभान विसरून नाचणारे वैष्णव, टाळ मृदुंगाचा गजर, विद्याधाम प्रशालेच्या विद्याथीर्नींचे लेझीम पथक, पावसाच्या सरी अशा भाक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त असणा-या संत निंबराज महाराजांचा ३५६ वा पालखी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.आषाढी वारीचे वेध लागलेल्या भाविकांमुळे सकाळपासूनच हरीगजराने मंदीर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प चंद्रकांत दंडवते यांच्या हस्ते विणापूजन करून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मंदीराबाहेर आणली.
यावेळी देवदैठण, येवती, पाडळी, ढवळगाव, तडोर्बावाडी, गोलेगाव, शिरूर, बाभूळसर येथील वारकरी सहभागी झाले आहेत. वीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर पालखी पंढरपूरमध्ये पोहचते. पंढरपूरला काल्याच्या किर्तनाचा मान संत निंबराज पालखीचा असल्यामुळे गोपाळपूर येथे काल्याचे किर्तनाने सोहळ्याची सांगता होते, अशी माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दंडवते, सुरेश लोखंडे यांनी दिली.