१३ हजार बांधकाम कामगारांना सानुग्रहाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:48+5:302021-05-05T04:34:48+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात कामगारांना सरकारी मदतीचा लाभ मिळू लागला आहे. जिल्ह्यातील १३ हजार ४०० बांधकाम कामगारांच्या बँक ...
अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात कामगारांना सरकारी मदतीचा लाभ मिळू लागला आहे. जिल्ह्यातील १३ हजार ४०० बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदानाचे दीड हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन जाहीर करताना हातावर पोट असणाऱ्यांना सानुग्रह आनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील १३ हजार ४०० कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ज्या कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करताना बँक खात्याबाबतची माहिती दिली, अशा कामगारांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, ही नोंदणी सुरूच आहे.
लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील इमारतींचे बांधकाम ठप्प आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील लॉकडाऊनमध्ये कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने कामगारांसाठी विशेष निधीची तरतूद केली. त्यानुसार कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून, कामगारांनी ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कार्यालयाकडे करण्यात आले आहे.
....
कामगारांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष
असंघटित कामगारांसाठी सरकारने सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. संघटित कामगारांना लॉकडाऊनच्या काळात पगार देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, दुकानदानातील कामगार, कारखाने, कंपन्यांकडून पगार न देणे, वेळेवर न देणे, याबाबत कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले आहे.