साकळाई योजनेच्या सर्व्हेचे आदेश : शेतक-यांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:23 PM2019-03-07T17:23:17+5:302019-03-07T17:30:54+5:30
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश पुण्याच्या सिंचन विभाग कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
केडगाव : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई पाणी योजनेच्या कामाचा सर्व्हे सुरू करण्याचे आदेश पुण्याच्या सिंचन विभाग कार्यालयास प्राप्त झाले आहेत. सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांसाठी साकळाई उपसा जलसिंचन योजना मंजूर व्हावी यासाठी कृती समिती आणि योजनेत येणा-या गावांचा लढा सुरू आहे. मागील महिन्यात दिपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली रुई छत्तीशी येथे आंदोलन करण्यात आले होते. दिपाली सय्यद यांच्या आधीच डॉ. सुजय विखे व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्याना भेटून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. आदेश देऊनही पुन्हा काहीच हालचाली न झाल्याने साकळाई कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रुई छत्तीशी येथील आंदोलनात जाहीर केल्यानुसार दिपाली सय्यद यांनी साकळाई योजना कृती समितीच्या सदस्यांसह २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. साकळाईचा सर्व्हे येत्या आठ दिवसात सुरू होईल, असे आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यानी दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपणास दिलेला शब्द खरा केला असून या योजनेचा सर्व्हे तातडीने सुरु करून स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश पुण्याच्या सिंचन विभागाच्या कार्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिली.