संगमनेरातील ९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:55+5:302021-02-13T04:20:55+5:30
संगमनेर तालुक्यात एकूण १४३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची ...
संगमनेर तालुक्यात एकूण १४३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, यातील खळी (अनुसूचित जाती स्त्री), मिरपूर (अनुसूचित जमाती), चिखली (अनुसूचित जमाती स्त्री), सावरगाव घुले (अनुसूचित जाती स्त्री), शिंदोडी (अनुसूचित जाती स्त्री), जवळे कडलग (अनुसूचित जमाती स्त्री), सोनेवाडी (अनुसूचित जमाती स्त्री),वेल्हाळे (अनुसूचित जाती स्त्री), पारेगाव खुर्द (अनुसूचित जमाती स्त्री) या नऊ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित प्रवर्गातील सदस्य निवडून न आल्याने येथील सरपंच पदे रिक्त आहेत.
खळी, सावरगाव घुले, शिंदोडी व वेल्हाळे या चार ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्य आहेत. तर चिखली, जवळेकडलग, सोनेवाडी व पारेगाव खुर्द या चार ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य आहेत. तसेच मिरपूर ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गातील सदस्य पदासाठी नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्यामुळे ते रिक्त आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी लेखी कळविले आहे.
...........................
९४ ग्रामपंचायतींकरिता सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदाचे आरक्षण प्रवर्गातील सदस्य उपलब्ध नसल्याने, सरपंच निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने खळी, मिरपूर, चिखली, सावरगाव घुले, शिंदोडी, जवळेकडलग, सोनेवाडी, वेल्हाळे, पारेगाव खुर्द या ग्रामपंचायतींचे सरपंच पद रिक्त राहिले आहे. या ग्रामपंचायतींचेे फेरआरक्षण करून मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली असून पत्रव्यवहार केला आहे.
-अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर