वाघुंडे बुद्रुकचे सरपंचपद राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:26 AM2021-02-05T06:26:52+5:302021-02-05T06:26:52+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुकमध्ये सत्तारूढ गटाला शह देत अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण ...

Sarpanch post of Vaghunde Budruk will remain vacant | वाघुंडे बुद्रुकचे सरपंचपद राहणार रिक्त

वाघुंडे बुद्रुकचे सरपंचपद राहणार रिक्त

सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुकमध्ये सत्तारूढ गटाला शह देत अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण निघाले. त्यात सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. या प्रवर्गाचा कोणीही उमेदवार निवडणुकीत विजयी झाला नाही. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. वाघुंडे खुर्द येथे चारही महिला सरपंचपदासाठी इच्छुक आहेत.

वाघुंडे बुद्रुक येथील प्रभाग एकमधून अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुष उमेदवार संदीप वाघमारे विजयी झाले. त्यामुळे सध्या तरी वाघुंडे बुद्रुक येथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात येईल. इतर गावांच्या सर्व सरपंच निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त पदांबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल प्राप्त झाल्यावर ते निर्णय घेतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. अपक्षांनी बाजी मारलेल्या निवडणुकीत प्रभाग एकमधून तीनही अपक्ष विजयी झाले. प्रभाग दोनमधून आपलाच एक समर्थक विजयी झाल्याचा दावा नवनिर्वाचित सदस्य गणेश रासकर यांनी केला असून, आरक्षण बदल झाले तरी आपलाच माणूस सरपंच होईल व उपसरपंचपद आपल्याकडे घेण्याचा मनोदय रासकर यांनी व्यक्त केला आहे सरपंचपद अनुसूचित जाती पुरुषासाठी निघाले, तर संदीप वाघमारे यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत रासकर यांनी दिले.

वाघुंडे खुर्द जुन्या एमआयडीसीलगत असल्याने तेथे आधीच कारखानदारी वाढली आहे. तशीच काहीशी स्थिती असल्याने येथील सरपंचपद मानाचे ठरणार आहे. येथील सरपंचपद खुल्या वर्गातील महिलेसाठी असल्याने व त्यासाठी सत्तारूढ गटातून बिनविरोध निवड झालेल्या सुप्रिया संतोष पवार, तर त्यांच्या विरोधी गटातील बहुमत प्राप्त पॅनलमधून आलेल्या चारही महिला इच्छुक आहेत. त्यात कविता मगर, विजया मगर, रेश्मा पवार व मंगल मगर यांचाही समावेश आहे. ऐनवेळी सत्तारूढ गटाकडून समोरच्या बहुमतातील सदस्य आपल्या गटात घेण्यास यश मिळाले तर बाजी पालटू शकते. तसा पूर्वइतिहास असल्याने वाघुंडे खुर्दमध्ये काहीही घडू शकते.

----

यापूर्वी थेट जनतेतून निवडून येणारा सरपंच त्याला निवडीसाठी बहुमताची गरज नव्हती. जनतेने ठरवलेली व्यक्ती गावचा प्रथम नागरिक सरपंच निवडला जाई. आता सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर हे पद मिळवता येत असल्याने सदस्यांना सरपंच निवडीत महत्त्व प्राप्त झाल्याने बहुमत टिकवण्यासाठी धडपड करावी लागते.

-अश्विनी थोरात,

उपाध्यक्ष, सरपंच परिषद

Web Title: Sarpanch post of Vaghunde Budruk will remain vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.