सरपंच हेच गावचे शिल्पकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:47 AM2019-08-01T05:47:26+5:302019-08-01T05:47:53+5:30
देवेंद्र फडणवीस : ग्रामविकासासाठी राज्याची तिजोरी खुली करू
शिर्डी : सरपंच हेच गावचे खरे शिल्पकार असून ग्रामविकासाबाबत शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्याची तिजोरी खुली ठेवू. सरपंचाच्या उरलेल्या समस्या नव्या सरकारमध्ये मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले़
ग्रामविकास विभागाच्या वतीने शिर्डीत सरपंच, उपसरपंचांच्या राज्यस्तरीय कार्यशाळा व परिषदेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, राज्यमंत्री दादा भुसे आदींसह ५० हजार सरपंच-उपसरपंचांची उपस्थिती होती़
सरपंचांची मानधन वाढ हा तर ट्रेलर आहे़ पिक्चर अभी बाकी है, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीत सरपंचाचे प्रतिनिधी घेण्यात येतील. तसेच पुरस्कारही सुरू करण्यात येतील. उपसरपंचांना मानधन सुरू केले आहे. सदस्यांनाही बैठकीचा भत्ता वाढविण्यात येईल. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अभ्यास समिती नियुक्त केली जाईल. सरपंचांच्या थेट निवडीच्या रुपाने त्यांना सन्मान मिळवून दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला़
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच वर्षात तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. सरकारशी संलग्न राहण्यासाठी कायदेशीर सरपंच परिषद तयार करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिल्या़
पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता आमच्यासाठी नसून सामान्यांच्या सेवेसाठी आहे़ आमची भूमिका मान्य झाली म्हणून सरपंचांची मोठी गर्दी झाली़ गावातला माणूस गावात कसा राहिल यासाठी काम करायला हवे. अनेक योजनांमुळे गावांची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक योजना आजही सुरू आहेत़ मात्र ज्या योजना काही कामाच्या नाहीत त्या बंद केल्या़
ड्रोनद्वारे गावठाण मोजणीला पावसाचा अडथळा
ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डीतून करण्यात आला़ पावसामुळे मात्र ड्रोन उडालेच नाही़ त्यामुळे प्रात्यक्षिक न करताच उद्घाटन पार पडले़ दीड वर्षांत जीआयएस मॅपिंगद्वारे काम पूर्ण होऊन प्रत्येकाला प्रॉपर्टीचा दाखला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले़
मुख्यमंत्री-ग्रामविकास मंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमने
पंकजा मुंडे यांचे ग्रामविकासाचे काम अत्यंत चांगले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर मुंडे यांनीही विकासाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देत विकासासाठी अपेक्षा व मागणीपेक्षाही अधिक निधी देतात, असे सांगितले़ राधाकृष्ण विखे यांच्या नावासमोरुन नामदार कधी हटलेच नाही. ते इकडे आल्याने चांगले झाले ते आमच्या कुटुंबातील असल्याचे त्या म्हणाले.