शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:48+5:302021-02-13T04:20:48+5:30

घारगाव (जि. अहमदनगर) : गावातील महिलांना फेटे, वयोवृद्ध नागरिकांचे लेझीम पथक, मिरवणुकीसाठी सजवलेल्या बारा बैलगाड्या, गावात सर्वत्र रांगोळ्या रेखाटलेल्या... ...

Sarpanch's direct entry from the helicopter for the swearing in ceremony | शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

घारगाव (जि. अहमदनगर) : गावातील महिलांना फेटे, वयोवृद्ध नागरिकांचे लेझीम पथक, मिरवणुकीसाठी सजवलेल्या बारा बैलगाड्या, गावात सर्वत्र रांगोळ्या रेखाटलेल्या... आणि तेवढ्यात हेलिकॉप्टर येते. जयघोष सुरू होतो... हा जयघोष कोणा मुख्यमंत्र्यांचा किंवा मंत्र्यांचा नसतो तर तो असतो एका सरपंचाचा. निमित्त होते सरपंचपदाच्या शपथविधीचे. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावचे नवनियुक्त सरपंच पदभार स्वीकारण्यासाठी थेट हेलिकॉप्टरमधून आले अन् गाव आनंदात रंगून गेले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) हा अनोखा शपथविधी पार पडला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे यांनी गावाच्या निवडणुकीत प्रथमच सहभाग घेतला. त्यांचे ९ सदस्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले. सरपंचपदाची माळही गागरे यांच्याच गळ्यात पडली अन् गागरे सरपंचपदाचा पदभार घेण्यासाठी पुण्यातून आंबी दुमाला या आपल्या गावी आले ते थेट हेलिकॉप्टरमधूनच. सरपंच पदाचा हा सोहळाही भव्यदिव्य करायचा चंग गागरे यांनी बांधला होता. गावात सर्वत्र दिवाळीच्या सणासुदीप्रमाणे सडारांगोळी करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी १२ बैलगाड्या सजविण्यात आल्या होत्या. सर्व महिलांना फेटे बांधण्यात आले अन् सरपंच गावात येताच वृद्धांनी लेझिमच्या तालावर ठेका धरीत गागरे यांचे जंगी स्वागत केले. हेलीपॅडजवळ सर्व गाव एकवटला. गागरे यांचा जयघोष करण्यात आला अन् तेथूनच त्यांची जंगी मिरवणूक सुरु झाली. वाजत-गाजत गागरे यांचे ग्रामपंचायत कार्यालयात आगमन झाले. नंतर त्यांनी पदभार स्वीकारला.

.................

तरुणांना दिला रोजगार

उद्योजक जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. आपल्या कंपन्यांमध्ये त्यांनी गावातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने गागरे पुण्यात राहात असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला.

कोट

गावाकडे चला, हा नारा महात्मा गांधीजींनी दिला होता. त्याच ध्येयाने मी गावात आलो असून, आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी हेलिकाॅप्टरने आलो आहे. गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

-जालिंदर गागरे, सरपंच, आंबी दुमाला.

Web Title: Sarpanch's direct entry from the helicopter for the swearing in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.