म्युकरमायकोसिसबाधित रुग्णाच्या मदतीसाठी सरसावले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:57+5:302021-05-23T04:19:57+5:30

बेलवंडी/विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील गणेश ज्ञानदेव गायकवाड हे म्युकरमायकोसिसने आजाराने बाधित आहेत. त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, ...

Sarsavale village to help a patient with mucomycosis | म्युकरमायकोसिसबाधित रुग्णाच्या मदतीसाठी सरसावले गाव

म्युकरमायकोसिसबाधित रुग्णाच्या मदतीसाठी सरसावले गाव

बेलवंडी/विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील गणेश ज्ञानदेव गायकवाड हे म्युकरमायकोसिसने आजाराने बाधित आहेत. त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, मित्र सरसावले असून त्यांनी १ लाख ८० हजार रुपये जमविले आहेत. त्यांना आणखी ७ ते ८ लाख रुपयांच्या मदतीची गरज आहे.

गणेश गायकवाड यांना १७ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती. दौंड येथे एका रुग्णालयात त्यांनी कोरोनावर उपचार घेतले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना २६ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. नंतर त्यांना चार दिवसांनी दाढ दुखणे, डोळ्यात इन्फेक्शन होणे आदी लक्षणे दिसू लागली. त्यांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झाली. इन्फेक्शन वाढत जाऊन त्यांचा एक डोळा निकामी होऊन तो काढावा लागला. दुसऱ्या डोळ्यात संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या त्यांच्यावर नगर येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गायकवाड यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची आहे. उपचारासाठी ७ ते ८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. उपचारासाठी लागणारा प्रचंड पैसा कसा उपलब्ध करावा, असा प्रश्न या कुटुंबीयांना पडला आहे. पैसा जमा करणे कठीण झाल्यामुळे त्यांचे आई, वडील, मुलगा व पत्नी हतबल झाले आहेत.

नेहमीच एकमेकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या चिंभळा येथील हरितपरिवार बहूद्देशीय सेवा संस्था यांच्या वतीने व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून या कामी मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला दहावीच्या शैक्षणिक वर्षे २००२, २००४, २००६, २०१२ चे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी, तरुण वर्ग, ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या माध्यमातून १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

---

अशी करा मदत...

गणेशचा जगण्यासाठी संघर्ष चालू आहे. उपचारासाठी आणखी ७ ते ८ लाख रुपयांची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अजित गायकवाड ७७०९३४०७१४ व संदीप चोरडिया ९७६६२३४३४० यांच्या या ‘फोन पे’च्या क्रमांकावर आर्थिक मदत करावी, असे आवाहन हरित परिवार बहूद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Sarsavale village to help a patient with mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.