सतीश पोखर्णा दिल जितनेवाला कार्यकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:50+5:302021-01-08T05:03:50+5:30
श्रीगोंदा : बाजार समितीत सतीश पोखर्णा यांनी तत्त्वाचे राजकारण करताना विरोधकांशी मैत्रीचे धागे गुंफले. बाजार समितीच्या ...
श्रीगोंदा : बाजार समितीत सतीश पोखर्णा यांनी तत्त्वाचे राजकारण करताना विरोधकांशी मैत्रीचे धागे गुंफले. बाजार समितीच्या विकासात योगदान देताना शेतकऱ्यांचे हित जोपासले. मदतीचा हात देऊन गरीब माणसांच्या चुली पेटविल्या. त्यामुळे सतीश पोखर्णा हे समाजकारणातील ‘दिल जितनेवाला कार्यकर्ता’ म्हणून हृदयात राहणार आहेत, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
बाजार समितीचे संचालक सतीश पोखर्णा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बाजार समितीत सोमवारी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी जुन्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. बाजार समितीत सतीश पोखर्णा यांच्या रिक्त जागेवर गौरव पोखर्णा यांना काम करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
माजी आ. राहुल जगताप म्हणाले, सतीशशेठ यांनी यांनी राजकारणात मैत्री, विकास आणि विचाराला महत्त्व दिले. साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते म्हणाले, सतीश पोखर्णा अतिशय धाडसी आणि थेट बोलणारे होते. मात्र, मनात कोणाविषयी द्वेष नव्हता. व्यापारी संजय खेतमाळीस म्हणाले, मी बाजार समितीत कांदा व्यापार सुरू केला. त्यावेळी मला सतीशशेठ यांनी स्वत:चा वजन काटा दिला होता. त्यांच्यासारखा दिलदार मित्र पुन्हा लाभणार नाही.
यावेळी संजय जामदार, शिवाजी शेळके, रमेश गिरमकर, अरुणराव पाचपुते, सतीश जामदार, नवनीतलाल मुनोत, भाऊसाहेब कोथिंबिरे,
सुरेश शेंडगे, महावीर पटवा, बापूसाहेब वाबळे, समीर बोरा, मितेश नाहाटा, दत्ताजी जगताप यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी हरिदास शिर्के, सुजाता जाधव, सतीश बोरा, रमेश बोरा, चंद्रकांत कटारिया, उमेश पोटे, आदिक वांगणे, सुरेश भंडारी, धनजी गुगळे, ऊर्मिला गिरमकर, दिलीप डेबरे आदी उपस्थित होते.
फोटो ०४ सतीश पोखर्णा