एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेशात अन्याय होण्याची भीती, सत्यजित तांबे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:20 AM2020-07-16T02:20:48+5:302020-07-16T02:22:03+5:30
बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.
संगमनेर : दहावी व बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात, त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन केवळ २० टक्के असल्याने अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी तोडगा काढून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तांबे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा शोधावा. या वर्षासाठी केंद्रीकृत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करून महाविद्यालयीन पातळीवर आॅनलाईन पद्धती सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे.