‘त्या’ शेतकऱ्याच्या खात्यावर १,४०० ऐवजी जमा झाले ३० हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:36 AM2023-01-10T07:36:18+5:302023-01-10T07:36:27+5:30
केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते.
- नितीन गमे
राहाता (जि. अहमदनगर) : शेतकऱ्याच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने प्रतिगुंठा ५ रुपयांप्रमाणे १४०६ रुपयांची रक्कम जमा केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल विमा कंपनीने घेतली त्या शेतकऱ्याच्या खात्यावर आता ३० हजार रुपये जमा झाले आहेत. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाल्याची भावना शेतकरी सावळाराम गमे यांनी व्यक्त केली आहे.
केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी गमे यांना अवघे १४०० रुपये मिळाले होते. त्यानंतर ‘८० रु. विमा, ५ रुपये जमा, काय थट्टा लावली राव ! अशी बातमी २ नोव्हेंबर २०२२ च्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पुणे कृषी आयुक्तालय, नगर कृषी अधीक्षक कार्यालय यांनीच थेट दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून इन्शुरन्स कंपनीला पत्र दिले होते. यात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देऊन शेतकऱ्याची थट्टा केल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. गमे यांच्या खात्यात विमा कंपनीने फक्त ५ रु. प्रति गुंठ्याप्रमाणे १४०० रु. जमा केले होते. आता गमे यांच्या खात्यावर ३० हजार रुपये जमा झाले आहेत.
बातमीनंतर दिले ४.३६ काेटी
राहाता तालुक्यातील १५ हजार ४१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यामध्ये ८ हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीस तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात ७ हजार ८५ शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २ कोटी ३६ लाख जमा झाले होते; परंतु ‘लोकमत’ने गमे यांच्याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच कंपनीने इतर शेतकऱ्यांच्याबाबतही संवेदनशीलता दाखवली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या खात्यातही ४ कोटी ३० लाखांचा दुसरा हप्ता वर्ग झाला. आतापर्यंत तालुक्यातील ६ कोटी ६६ लाख रुपये विमा कंपनीकडून जमा करण्यात आले आहेत.
ज्यांना शून्य रक्कम, त्यांनाही होणार लाभ
कंपनीस तक्रार करणाऱ्या सरासरी १३०० ते १५०० शेतकऱ्यांना अजून काहीही रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांना १५ जानेवारीच्या आत रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते.