अहमदनगरमधील सावेडी कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:08 PM2019-06-03T22:08:45+5:302019-06-03T22:09:27+5:30

सावेडी उपनगरात धुराचे साम्राज्य, शेतकऱ्यांचे नुकसान

Savde garbage deppola fire in Ahmednagar, hundreds of tons of garbage khak | अहमदनगरमधील सावेडी कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा खाक

अहमदनगरमधील सावेडी कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा खाक

अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. डेपोला आग लागल्याने सावेडी उपनगर परिसरात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले.  

महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे. शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपो साठविला जातो. या साठविलेल्या कचऱ्यापासून खत बनविले जाते. या ठिकाणी साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आगीने वेढले. सोसाट्याचा वारा असल्याने आग भडकली होती. आगीची भीषणता लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. महापालिकेचे दोन अग्निशमन बंब साडेसात वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. परंतु, त्यापैकी एक बंब नादुरूस्त होता, असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका बंबाच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. पण, आग आटोक्यात आली नाही. कचऱ्यात प्लास्टिकचाही समावेश असल्याने आग आणखी भडकली.

या आगीने उग्र रुप धारण केल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा हिरवा चारा, फळबागा होरपळल्या आहेत. कचरा डेपोला लागलेल्या आगीचा धुर सावेडी उपनगरांतील ढवणवस्ती, निर्मलनगर, लक्ष्मीनगर, आदी भागात पसरला होता. तपोवन रस्ता परिसरातही धुरासह दुर्गंधी पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बुऱ्हाणनगर हद्दीत नव्याने वसाहती उभ्या राहिलेल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य होते. रात्री उशिरापर्यंत आग अटोक्यात न आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. गतवर्षी मे महिन्यात कचरा डेपोला आग लागली होती. डेपोला दुसऱ्यांदा सोमवारी आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही
 
महापौर वाकळे यांनी दिली भेट
कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह नगरसेवक संपत बारस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आग आटोक्यात आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे वाकळेंनी सांगितले.

आगीची माहिती देऊनही अधिकारी व कर्मचारी आले नाहीत़ साडेसात वाजता दोन अग्निशमन बंब आले़ त्यापैकी एक बंद होता़ त्यामुळे आग विझविण्यास उशिर झाला.
करण शेवाळे, शेतकरी

Web Title: Savde garbage deppola fire in Ahmednagar, hundreds of tons of garbage khak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.