मराठी शाळा वाचवा ; छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक
By शेखर पानसरे | Published: October 4, 2022 11:42 AM2022-10-04T11:42:16+5:302022-10-04T11:46:37+5:30
संगमनेरात आंदोलन : राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
संगमनेर : राज्यातील मराठी शाळा, सरकारी शाळा वाचविण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. मंगळवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतल्याने शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'मराठी शाळा वाचल्या पाहिजे', 'शिक्षणाचे खासगीकरण थांबले पाहिजे', 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री' यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशीमागणी यावेळी करण्यात आली. . संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सरकारला अदानी, अंबानी यांच्या खासगी शाळा चालवायच्या, असे दिसते आहे. मराठी शाळा, सरकारी शाळा बंद करणे म्हणजे गरीब, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कुऱ्हाड चालविण्यासारखे आहे. शिक्षण खाते शाळा चालवायला आहे की, बंद करायला आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही कित्येक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे सोडून ती मुले शिक्षणातच येऊ नये म्हणून प्रयत्न होत असून ही बाब गंभीर बाब असल्याचे घुले म्हणाले.
कमी पटसंख्या म्हणून सरकार शाळा बंद पाडत असेल तर तेथे पटसंख्या वाढविण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले गेले का? खासगी शाळांना मान्यता द्यायची, भरमसाठ फी वाढवायची आणि मोफत शिक्षण असणाऱ्या शाळा बंद करायच्या. असे धोरण राबविले जात आहे. त्यामुळे सरकारकडूनच आता शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची ही फक्त सुरुवात आहे. हळू हळू एक-एक शाळा बंद होतील आणि लोक बघत बसतील. त्यामुळे एकही शाळा बंद पडू नये म्हणून रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करणार असल्याचेही घुले यांनी सांगितले.