बचत गट महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतात : शालिनी विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 07:07 PM2019-01-10T19:07:16+5:302019-01-10T19:07:24+5:30
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.
अहमदनगर : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.
शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा - 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, शरदराव झोडगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाल्या, महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. आजही ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्या कुटूंबाच्या कौंटुबिक अर्थव्यवस्थेला मदत होते. बचत गटाच्या माध्यमातून आत्मविश्वास व आर्थिक स्थिरता मिळण्याचे महत्वाचे काम केले जाते. महिला बचतगटाचे कर्ज परत फेडीचे प्रमाण अत्यंत चांगले असून महिला आर्थिक नियोजनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून आजही राज्यातील महिला टंचाईस्थितीतही सक्षमपणे उभ्या आहेत हेच बचतगट चळवळीचे महत्वाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. आजही शिर्डी व ग्रामीण भागात बचतगटाच्या माध्यमातून सेंद्रीय अगरबत्ती तयार करण्याचे महत्वाचे काम केले जात आहे.
प्रदर्शन 14 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.