कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी सव्वाचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:20+5:302021-06-27T04:15:20+5:30
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ४ कोटी २४ लाख रुपयांचा ...
जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत
४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी विविध कामांसाठी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला.
कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती विजेबरोबरच वाणिज्य, औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने पवार यांनी वीज वितरण कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावर वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील मोरे वस्ती, पिंपळगाव आळवा येथील बारवकर वस्ती, बांधखडक येथील चव्हाण वस्ती, तेलंगशी येथील मोरे वस्ती, जवळके येथील वाळुंजकर-कांबळे वस्ती व घोडेगाव येथील तळेकर वस्तीसाठी नवीन ६ रोहित्रे मंजूर झाली आहेत.
कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील नवीन वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन हे उपकेंद्रही कार्यान्वित झाले. बाभूळगाव दुमाला येथील मोहिते वस्ती, करमनवाडी येथील खराडे वस्ती, गणेशवाडी येथील दातीर वस्ती, काळेवाडी येथील जिराफवस्ती, चिलवडी येथील नवले वस्ती, करपडी येथील मोहिते वस्ती, बारडगाव दगडी येथील घासले वस्ती, म्हाळंगी येथील जगताप वस्ती, तसेच निमगाव गांगर्डा, मांदळी व निमगाव आदी गावे व वाड्या-वस्त्यांसाठी नवीन ११ रोहित्रे मंजूर केली आहेत.
मांदळी येथील गावठाण वाहिनीच्या अलगीकरणासाठी ४३ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. मांदळीसह निमगाव व परिसरातील गावात गावठाण फिडरसाठी ११ कि.मी. लांबीची नवीन उच्च दाबाची वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. ३ नवीन रोहित्र उभारण्यात आले आहेत.