Ahmednagar: अन्यथा तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, ठाकरे गटाचा इशारा
By अरुण वाघमोडे | Published: August 23, 2023 05:17 PM2023-08-23T17:17:27+5:302023-08-23T17:17:51+5:30
Ahmednagar: श्वान निर्बीजीकरण कामत झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, असा इशारा ठाकरे गटाने बुधवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आला.
- अरुण वाघमोडे
अहमदनगर - खासगी तत्वावर देण्यात आलेल्या श्वान निर्बीजीकरण कामत झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, असा ईशारा शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) बुधवारी (दि. २३) महापालिका आयुक्तांना देण्यात आला.
याबाबत युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, परेश लोखंडे, संदिप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, जेम्स आल्हाट, अरुण झेंडे, महेश शेळके, शाम सोनवणे, मुन्ना भिंगारदिवे, गिरिष शर्मा, दिपक कावळे, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे यांनी मनपात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या नागरिकांच्या जिवावर उठल्या आहेत. शहरात चौकाचौकात रात्रीअपरात्री आणि दिवसाढवळ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या वाहनचालकांचा पाठलाग करून हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मागील वर्षी श्वान निर्बीजीकरण आणि मोकाट कुत्री पकडण्यासाठी मनपाने पिपल फॉर अनिमल्स या संस्थेला टेंडर दिले होते. या टेंडरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शॅडो पार्टनर होता. प्रत्यक्ष सर्व कामे कागदावरच झाली आणि प्रति श्वान निर्बिजीकरण केल्याचे दाखवून लाखोंची बोगस बिले लाटल्याचा आरोप यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आता नव्याने देण्यात येणारे कामही पहिल्याच शॅडो पार्टनरला देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे हे काम पारदर्शीपणे करून नगरकरांची कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.