जेऊर सेवा संस्थेत घोटाळा : संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:16 PM2018-09-05T16:16:08+5:302018-09-05T16:16:11+5:30
जेऊर (ता. नगर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १ कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
केडगाव : जेऊर (ता. नगर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १ कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सभासदांनी कर्जापोटी रोख भरणा केलेली रक्कम तेथील सचिवाने बळकावल्याचे तपासात समोर आले आहे. जेऊर येथील जिल्हा बँक शाखेचा शाखाधिकारी, तपासणी अधिकारी यांनीही अहवाल तपासणीत हलगर्जीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे सेवा संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिवावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगर तालुका सहकारी संस्था उपनिबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी दिले आहेत.
प्रशासकीय विशेष अहवालात जेऊर सेवा संस्थेच्या एकूण कामकाजाबाबतच गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जेऊरच्या जिल्हा बँक शाखेचे शाखाधिकारी यांनी संस्थेच्या दप्तराची तपासणी करताना सचिवाने दिलेल्या चुकीच्या आर्थिक पत्रकावरून तपासणी केली. योग्य खबरदारी न घेता कामकाज केलेले आहे. तसेच बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने संस्थेच्या दप्तर दिरंगाई, अनियमिततेबाबत वेळीच दखल घेवून उपाययोजना केलेल्या नाहीत. बँक व्यवस्थापनाने संस्थेच्या संगणकीय कामकाजात दोष, त्रुटी, उणीवांबाबत योग्य ठोस धोरणांचा अवलंब केला नाही. संस्थेचे सदोष संगणकीय कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे १ एप्रिल २० ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत सभासदांनी संस्थेस कर्जापोटी १ कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा रोख भरणा केला. मात्र सचिवाने ही रक्कम बँकेत न भरता त्याचा अपहार केला. सुपरवाझिंग फेडरेशन तपासणी अधिकारी यांनीही संस्थेच्या दप्तराची प्रत्यक्ष तपासणी करताना संस्था सचिवाने सादर केलेल्या चुकीच्या आर्थिक पत्रकावरून तपासणी केली. तसेच त्यांनी संस्थेच्या संपूर्ण दप्तराची तपासणी न करताच अहवाल दिला. मात्र हा अहवाल रास्त व परिपूर्ण नाही. फेडरेशन तपासणी अधिका-याने संस्थेच्या निधीचा गैरव्यवहार वेळीच निदर्शनास आणून दिला नाही. तसेच तपासणी कालावधीत संस्थेने ठरावान्वये नियुक्त केलेले संबंधीत लेखापरीक्षक यांनीही लेखापरीक्षकाची जबाबदारी व कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नाही. तपासणी कालावधीत संस्थेच्या सचिवाने पदाचा दुरुपयोग करून संस्थेच्या निधीचा गैरवापर केला. संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संपूर्ण संचालक मंडळाने सचिवाचा गैरव्यवहार वेळीच रोखला नाही. गैरव्यवहाराची भरपाई करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून रकमेची वसुली केलेली नाही. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक नुकसानीस संस्थेचे सचिव व तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकारी यांना जबाबदार धरण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.
सहा महिन्यात चौकशी
संस्थेतील गैरव्यवहाराबाबत गंभीर मुद्दे आढळून आले आहेत. त्या सर्व बाबींची चौकशी करून आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून कोणाकडून किती रक्कम वसूल करायची याचा अहवाल येत्या सहा महिन्यात सादर करण्यात येणार आहे. यासाठी चौकशी अधिकारी म्हणून श्रीगोंदे येथील सहायक निबंधक आर. ए. खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.