टंचाई तीव्र, नगर जिल्ह्यात २६२ टँकरने ५ लाख लोकांना पाणीपुरवठा
By चंद्रकांत शेळके | Updated: April 30, 2024 21:06 IST2024-04-30T21:05:37+5:302024-04-30T21:06:44+5:30
ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे.

टंचाई तीव्र, नगर जिल्ह्यात २६२ टँकरने ५ लाख लोकांना पाणीपुरवठा
अहमदनगर : जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशा टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे रोज टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली असून, सद्य:स्थितीत टँकरची संख्या २६२ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ८९ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. तर ग्रामीणसह आता नगरपालिका क्षेत्रातही टँकरची गरज भासू लागली आहे.
दरवर्षी ॲाक्टोबर ते जून या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. यंदा ८४ कोटी ४५ लाख रुपयांच्या जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. यात पाण्याच्या टँकरच्या खर्चासाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, या आराखड्यात १ हजार १८५ गावांत आणि ३ हजार ८८६ वाड्या- वस्त्यांवर पुढील जून २०२४ पर्यंत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
उन्हाळ्याचे अडीच महिने सरले आहेत. यातच टँकरची संख्या २६२ वर पोहोचली आहे. मार्चच्या प्रारंभी साधारण टँकर सुरू झाले. १९ मार्चला जिल्ह्यात ५३ टँकर सुरू होतो. तेथून पुढे झपाट्याने टँकरची संख्या वाढली. १३ एप्रिलला १५८ टँकर, १९ एप्रिलला २१०, तर आता २६२ वर टँकरचा आकडा पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी उष्णता वाढण्याची शक्यता असल्याने टँकरचा आकडाही झपाट्याने वाढणार आहे.
रोज वाढताहेत टँकर
जिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्याही रोज वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २४६ गावे व १३६७ वाडी-वस्तीवरील ५ लाख १० हजार लोकांना २६२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ८९ टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत.
तालुका टँकर संख्या
संगमनेर २५
अकोले ५
नेवासा २
नगर १८
पारनेर २९
पाथर्डी ८९
शेवगाव १०
कर्जत ३४
जामखेड १८
श्रीगोंदा ९
पाथर्डी नगरपालिका १
कर्जत नगरपालिका १२
पारनेर नगरपालिका २
श्रीगोंदा नगरपालिका ४
शेवगाव नगरपालिका १
---------
एकूण २६२