एटीएममध्ये पैशांचा तुटवडा
By Admin | Published: May 10, 2017 01:36 PM2017-05-10T13:36:05+5:302017-05-10T13:36:05+5:30
शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ १० - शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातही एटीएम मशिनमधून पैसे येत नसल्याने ग्राहकांची पैशांसाठी भटकंती सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नसल्याने एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहेत.
नगर शहरातील सर्वच बँकांमध्ये ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे. बँकामध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी काही एटीएममध्येही पुरेसे पैसे उपलब्ध होते, मात्र पाहिजे तेवढी रक्कम काढता येत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
ग्रामीण भागात मात्र ग्राहकांची निराशा आहे. राहाता शहरात पाच ते सहा एटीएम आहेत. मात्र कोणत्याच मशिनमधून पैसे मिळत नाहीत. मशिनमध्ये फक्त पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने शंभराच्या पटीत पैसे काढणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विशिष्ट वेळीच मशिनमधून पैसे काढता येत असल्याची स्थिती आहे.
पारनेर तालुक्यातील पळवे या गावातील ग्राहकांना महामार्गावरील सुपा येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी यावे लागते. मात्र एटीएममध्ये खडखडाट असल्याने ग्राहकांना चकरा माराव्या लागत असून ग्राहकांना ताटकळत बसावे लागते आहे. निघोज (ता. पारनेर) या गजबजलेल्या गावातील तिन्ही एटीएमवर ग्राहकांच्या रांगा होत्या. मंगळवारी एटीएममध्ये पैसे नव्हते. नोटाबंदीनंतर एटीएम बंदी झाल्याची ग्राहकांमध्ये चर्चा होती. शनिशिंगणापूरमध्ये मात्र ग्राहकांना पैसे उपलब्ध होत आहेत. तेथे बँकेपेक्षा एटीएमवरच ग्राहकांची जास्त गर्दी होती. भेंडा (ता. नेवासा) येथे एटीएममध्ये खडखडाट होता, मात्र बँकांमध्ये पैसे मिळत आहेत. जिल्हा बँकेचे एटीएम धुळखात पडून असल्याने ग्राहकांना बँकांमध्येच रांगा लावाव्या लागत आहेत.
एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याच्या दोन ते तीन दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी आहेत. कोणत्याही महिन्याच्या १ ते १० या तारखेदरम्यान बँकांवर ताण असतो. बॅकांमध्ये चलन पुरवठा उपलब्ध असेल त्या पद्धतीने एटीएम मध्ये पैसे उपलब्ध करून दिले. कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढावे, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नाही. मार्केटमध्ये पुरवठा केलेला पैसा परत येत नाही. लोकांचा भर कॅशलेस पेक्षा रोख व्यवहारांवर आहे. त्यामुळे आरबीआयने चलनाचा कृत्रीम तुडवडा केल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.