आढळगावात कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:20 AM2021-05-08T04:20:54+5:302021-05-08T04:20:54+5:30
श्रीगोंदा /आढळगाव : तालुक्यातील आढळगाव येथील सिद्धेश्वर कोविड हेल्थ केअर सेंटरमधून शुक्रवारपर्यंत ४४ कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर मात करून ...
श्रीगोंदा /आढळगाव : तालुक्यातील आढळगाव येथील सिद्धेश्वर कोविड हेल्थ केअर सेंटरमधून शुक्रवारपर्यंत ४४ कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामध्ये शुक्रवारी ११ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना हरिनामाचा जयघोष आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. यावेळी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
आढळगाव येथील तरुणाईने एकत्र येवून सिद्धेश्वर कोविड सेंटर सुरू केले आहे. यामध्ये डाॅ. प्रमोद गायकवाड, डॉ. नेमीचंद निकम, डॉ. कुमुदिनी शिंदे या रुग्णांवर सेवाभावी वृत्तीने उपचार करीत आहेत. येथे सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, सुभान तांबोळी, माउली उबाळे, दिनकर पंडित, मनोज ठवाळ, देवराव वाकडे, किरण बंड, जिजाराम डोके, अकबर तांबोळी हे स्वयंसेवक म्हणून सेवा करीत आहेत.
शुक्रवारी येथे बाबर महाराज यांचे प्रवचन झाले. येथे आता दररोज हरिनामाचा जागर सुरू करण्यात आला आहे.
कोविड सेंटरमध्ये सर्व सेवा उपलब्ध होण्यासाठी साडे तीन लाखाची लोकवर्गणी जमा झाली. तसेच औषधे, खाद्यपदार्थ जमा झाले.
नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष गांधी व संदीप गुगळे यांनी अन्नदानाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे रुग्णांना पौष्टिक आहार मिळत आहे.
---
आढळगाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर सेवाभावी वृत्तीने उपचार केले जात आहेत. त्यामुळे मला व मुलीला कोरोनावर मात करण्यासाठी हिम्मत मिळाली. येथील स्वयंसेवकांच्या कार्यास सलाम.
-संजय जमदाडे,
आढळगाव.
----
०७ आढळगाव
आढळगाव येथील कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडताना अशी फुलांची उधळण केली जाते.