खर्डा शाळेची इमारत मोडकळीस आल्याने अंगणवाडीत शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:25 PM2019-06-21T12:25:44+5:302019-06-21T12:26:33+5:30

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शुक्रवार पेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी अंगणवाडीत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागले.

School in Anganwadi due to the disruption of the Kharda school building | खर्डा शाळेची इमारत मोडकळीस आल्याने अंगणवाडीत शाळा

खर्डा शाळेची इमारत मोडकळीस आल्याने अंगणवाडीत शाळा

संतोष थोरात
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शुक्रवार पेठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी अंगणवाडीत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागले.
या शाळेची इमारत धोकादायक झाल्यामुळे शाळा जवळच्या अंगणवाडीत भरवावी लागली. अंगणवाडी व शाळेचे विद्यार्थी एकाच वेळी एकत्र आल्यामुळे प्राथमिक शिक्षक व अंगणवाडीसेविका यांची मोठी तारांबळ उडत आहे. १९५१ मध्ये बांधलेल्या या इमारतीस ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. भिंतीला तडे गेले असून इमारत मोडकळीस आली आहे. वीस ते पंचवीस फूट उंचीच्या चिरेबंदी भिंतीवर इमारत उभी आहे. पावसाळ्यात भिंती ओल्या होऊन पत्रे गळतात. इमारतीच्या भिंतींना तडा जाऊन भेगा पडल्या आहेत. भिंतींना भेगा पडल्यामुळे इमारत धोकादायक असल्यामुळे गेल्या वर्षीच मुलांना अंगणवाडीत बसण्याची वेळ आली होती. एक वर्ष उलटून गेले तरी नवीन शाळा खोल्या बांधण्यात न आल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे. अंगणवाडीसोबतच पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी एकाच वर्गात बसण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे. इमारत पाडण्यासाठी निर्लेखन अहवाल तयार असताना नवीन इमारत बांधकाम कशात अडकले? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. शाळा खोल्या निर्लेखन करण्याबाबत ग्रामसभा व स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे गेल्यावर्षी ठराव झाले होते. परंतु मागील वर्षापासून विद्यार्थ्यांना अंगणवाडीत अभ्यास करावा लागत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या मुलांचे ग्रामपंचायत सदस्या वैशाली थोरात यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी इंदूबाई सोनटक्के, मनीषा परांडकर, प्राथमिक शिक्षिका जनाबाई गलांडे, मुख्याध्यापिका स्वाती गलांडे उपस्थित होत्या.

इमारत मोडकळीस आल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अंगणवाडीत बसविण्यात येत आहे. दोन्ही विद्यार्थी एकत्र असल्याने गोंधळाची परिस्थिती झाली होती. मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होत आहे. -स्वाती गलांडे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शुक्रवार पेठ.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे नवीन इमारतीची मागणी केलेली आहे. शिक्षण विभागाने लवकर इमारत मंजूर करून मुलांच्या शिक्षणातील अडथळा करावे. - प्रवीण कुंभार, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.

 

Web Title: School in Anganwadi due to the disruption of the Kharda school building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.