नियमभंग करणा-या स्कूल बस होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 04:45 PM2019-06-20T16:45:38+5:302019-06-20T16:47:36+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीचा भंग करणा-या स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे़
अहमदनगर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीचा भंग करणा-या स्कूल बस जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिला आहे़ येत्या आठ दिवसांत शाळेच्या गेटवर जाऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनांची तपासणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़
१७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ सकाळी रस्त्यांवरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसची गर्दी दिसते़ अनेक शाळांच्या स्कूल बस या फक्त रंगरंगोटी करूनच रस्त्यावर उतरविलेल्या दिसतात़ आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून बसविलेले दिसतात़ शाळेत स्थापन केलेल्या परिवहन समितीचेही या असुरक्षित वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे़ नगर शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी खासगी रिक्षाने शाळेतून येतात़ रिक्षांना शालेय वाहतुकीचा परवाना नाही़ मात्र विद्यार्थ्यांची रिक्षातून सर्रास वाहतूक होत आहे़ उपप्रादेशिक विभागाच्या तपासणी मोहिमेत स्कूल बसला शालेय वाहतुकीचा परवाना आहे का? आसनक्षमता, अग्नीशमन यंत्रणा, स्पिड गर्व्हनर, योग्यता प्रमाणपत्र आदी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे़
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी : पाटील
च्पालकांनी शालेय वाहतुकीचा परवाना असणा-या वाहनातूनच आपल्या मुलांना शाळेत पाठवावे़ आपल्या मुलांची वाहतूक करणारे वाहन धोकादायक असेल तर त्यासंदर्भात शाळेतील परिवहन समितीकडे तक्रार करावी़ येत्या आठ दिवसानंतर स्कूल बसची तपासणी करण्यात येणार आहे़ ज्यांनी नियमावलीची पूर्तता केलेली नाही त्यांनी तातडीने ती पूर्तता करावी़ तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या रिक्षाचालकांवरही कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले़