रानात पावका घेऊन हुंदडतात शाळकरी मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:58+5:302021-06-25T04:15:58+5:30

दुर्गम आदिवासी भागांमध्ये वसलेल्या गावांमध्ये मुले जमिनीपासून उंचावर नेणारा पावका हा कसरतीचा, उंच काठ्यांवर तोल सांंभाळण्याचा खेळ खेळत मौजमजा ...

School children wander in the forest with pavkas | रानात पावका घेऊन हुंदडतात शाळकरी मुले

रानात पावका घेऊन हुंदडतात शाळकरी मुले

दुर्गम आदिवासी भागांमध्ये वसलेल्या गावांमध्ये मुले जमिनीपासून उंचावर नेणारा पावका हा कसरतीचा, उंच काठ्यांवर तोल सांंभाळण्याचा खेळ खेळत मौजमजा करतात. कबड्डी, हुतुतू, भोवरा -

खोकड, विटी-दांडू, चाकारी याच बरोबर पावका हे भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पांजरे, उडदावणे, घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, मुतखेल, मुरशेत या भागातील मुलांचे खेळ आहेत.

पावका घेऊन मुले मोठ्या प्रमाणावर खेळताना आपल्याला दिसतात. पावका म्हणजे जंगलातील सरळ वाढणाऱ्या झाडांच्या लाकडी दांड्याला दिलेला एक विशिष्ट आकार होय. ज्या दांड्याला पाय ठेवण्यासाठी जागा असते. काटक व वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या झाडांच्या फांद्या यासाठी वापरतात. पावक्यावर चालताना आदिवासी मुले अत्यंत कुशलतेने व आत्मविश्वासाने आपली पावले टाकत असतात.

सध्या या भागामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरीच असतात. हा खेळ सर्वत्र खेळताना रस्त्याच्या दुतर्फा दिसतात.

शहरात उंच टाचांची चप्पल, बूट घालून चालणाऱ्यांची कसरत आपण पाहतो. येथील मुले पावक्यावरून अगदी सहज फेरफटका मारताना दिसतात. निसर्गाच्या कुशीत वाढलेली ही मुले अत्यंत कुशलतेने निसर्गातील विविध घटकांचा वापर करून आपले खेळ खेळत असतात.

हा पावका या मुलांना जीवनात एका उंचीवर नेऊन ठेवू शकतो. हा खेळ खेळताना त्यासाठी निवड करावयाची लाकडी पोल व त्याचा आकार याची निवड करणे, शरीराचा समतोल राखणे या सर्व गोष्टींमध्ये जो अनुभव आणि अभ्यास लागतो, तो या मुलांकडे आहे.

२३ पावका

Web Title: School children wander in the forest with pavkas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.