मंदिराच्या सभामंडपात भरते शाळा! : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:46 AM2019-07-06T10:46:08+5:302019-07-06T10:46:49+5:30
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक आहे.
टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी गावातील महादेव मंदिरातील सभामंडपात शिक्षणाचे धडे घेत आहेत. शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
येथे पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. विद्यार्थी संख्या १०० आहे. शाळेचे चारही वर्ग धोकादायक आहेत. ते वर्ग पाडून तेथे नवी इमारत उभारली जाणार आहे. सध्या या विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था महादेव मंदिरातील सभामंडपात केली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी पावसाच्या शिडकाव्यानंतर विद्यार्थी बसलेल्या शेडमध्ये पाणी आले होते. त्यामुळे विद्यार्थी कोरड्या जागेच्या शोधात एका कोपऱ्यात आसरा घेत होते. याबाबत ढाकणे यांनी शिक्षकांशी चर्चा केली. त्यांनी ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेविषयी चौकशी करत तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य किरण खेडकर, सरपंच बुधाजी ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवळे, अंबादास राऊत आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने विद्यार्थांची अर्धवट व्यवस्था केली. पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. यामुळे पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने आठ दिवसांपूर्वी ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांची व्यवस्था करा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवू असा इशारा दिला होता. अखेर पर्यायी व्यवस्था न झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरवली होती. त्या घटनेची दखल घेत गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे खरवंडी कासार येथे आले. त्यांनी गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे यांना विद्यार्थ्यांच्या बैठकीबाबत सूचना केल्या.
याबाबत खरवंडी कासार येथील शाळा खोल्यांच्या निधीसंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांचे लक्ष वेधणार आहे, असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी सांगितले.